Wednesday, 3 October 2018

10 आक्टोबरपासून शेतक-यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील






नवी दिल्ली,3 :  येत्या 10 आक्टोबरपासून महाराष्ट्रातील शेतक-यांच्या मुलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाणार असून याचा लाभ तीन लाख युवकांना होणार असल्याची  माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज येथे दिली.

केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्यावतीने  आज देशातील विविध राज्यांच्या कौशल्य विकास मंत्र्यांची  परिषद आयोजित करण्यात आली. बैठकीची अध्यक्षता केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतराव हेगडे यांनी केली. यावेळी श्री. पाटील बोलत होते.

श्री पाटील म्हणाले,  शेतक-यांना कृषी आधारित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे  गावामध्येच  रोजगार निर्मिती होईल.  शेतकऱ्यांचा कुटुंबातील तरुण-तरूणींना याचा लाभ होईल. यासाठीची संपूर्ण  तयारी महाराष्ट्र शासनाकडून झाली असून येत्या १० तारखेपासून याची सुरुवात होणार असल्याची माहिती श्री पाटील यांनी बैठकीत दिली. हे प्रशिक्षण  ३४ जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने होणार आहे. याअंतर्गत शेतीसाठी उपयोगात येणा-या उपकरणाच्या दुरूस्तीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पुर्णत: मोफत असणार आहे.

राज्यात 6 कौशल्य आधारित विद्यापीठ स्थापणार
महाराष्ट्रात 6 कौशल्य आधारित विद्यापीठ उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून यापैकी चंद्रपूर येथे वन आधारित कौशल्य विद्यापीठ तर  नवी मुंबई येथे सायबर सुरक्षा विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री पाटील यांनी यवेळी दिली. चंद्रपूर येथे उभारण्यात येणा-या वन आधारित कौशल्य विद्यापीठाचा कायदा लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच  4 कौशल्य आधारित विद्यापीठाबाबत आंतरीक  कार्यवाही सुरूआहे.  

येसरोजगार योजना राज्यात सुरू करणार
युवा सशक्तीकरण योजना (युथ एम्पावरमेंट स्कीम (येस)) राज्यात लवकरच सुरू करणार असल्याची माहिती श्री निलंगेकर पाटील यांनी दिली. याअंतर्गत बदलत्या काळानुसार रोजगारात बदल होत चाललेले आहेत. यामुळे रोगारातही बदल होत आहे. त्याप्रमाणे प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. येस च्या माध्यमातून या बदलत्या रोजगाराची माहिती युवकांपर्यत पोहचविण्यात येणार असल्याचा शासनाचा प्रयत्न  असल्याचे श्री पाटील म्हणाले.

स्टार्टअप यात्रा तरूणांसाठी उपयुक्त  

आजपासून महाराष्ट्रामध्ये  स्टार्टअप यात्रेची सुरूवात झाली असून यामाध्यमातून नवउद्योजक तयार होतील. या उद्योजकांमार्फतही  भविष्यात रोजगार निर्मित होईल, असा विश्वास व्यक्त करीत श्री पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्य सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे राज्य तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकीत आहे.
आजच्या बैठकीत त्यांनी राज्यातील आयटीआयची स्थिती सांगून या माध्यामातून 85 % रोजगार निर्माण होत  असल्याचे सांगितले. औद्योगिक क्षेत्राशी निगडित 4 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी औद्योगिक संस्थांशी करार  करण्यात आले. औद्योगिक संस्थांमध्ये होणा-या कामावर आधारित अभ्यासक्रम असल्यामुळे लाभार्थ्यांना याचा थेट लाभ होत असल्याचेही कौशल्य विकास मंत्र्यांनी यावेळी नमुद केले.

000000

No comments:

Post a Comment