Wednesday, 10 October 2018

‘पोषण माह’ अभियानांतर्गत महाराष्ट्राला १४ पुरस्कार प्रदान












                       
                           
नवी दिल्ली, १० : गरोदरमाता, स्तनदामाता यांना सकस आहार घेण्याबाबत तसेच राज्यातील लहान मुलांमधील कुपोषणाबाबत जागरूकता , मुलींचे सुपोषण व त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता करण्याबाबत ‘पोषण माह’ कार्यक्रमामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी आज महाराष्ट्राला एकूण १४ राष्ट्रीय पुरस्कार  प्रदान करण्यात आले.  

            केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने  येथील हॉटेल अशोक मध्ये आयोजित कार्यक्रमात या मंत्रालयाचे सचिव  राकेश श्रीवास्तव आणि निती आयोगाचे सदस्य  डॉ. विनोद कुमार पॉल यांच्या हस्ते पोषण माह पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील क्षेत्रिय स्तरावरील कार्यासाठी १२ वैयक्तिक व सांघिक कामासाठी  २ जिल्हास्तरीय असे एकूण १४ पुरस्कार प्रदान करण्यात आले. पदक आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.    

             ‘पोषण माह’ अंतर्गत महाराष्ट्रात असे कार्यक्रम राबविण्यात आले

 गोदभरायी’ या उपक्रमातून गरोदर मातेची  सातव्या महिन्यात ओटी भरणे व या महिलांना आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले. ‘अन्नप्राशन’ उपक्रमाद्वारे सहा महिन्याच्या बालकांपासून बालकांचा आहार कसा असावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  महिलांची थायरॉईड व हिमोग्लोबिनची चाचणी घेण्यात आली. मुलींना स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक अंगणवाडी केंद्रात ‘अक्षयपात्र’ हा उपक्रम राबविण्यात आला , या अंतर्गत महिलांचे प्रबोधन करून अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या आहारात विविधता येण्यासाठी  कांदे, बटाटे, कडीपत्ता, शेवग्याचा पाला आदी त्यांना अंगणवाडी केंद्रात आणण्यास सांगण्यात आले व या केंद्रातील आहारात त्याचा अंतर्भाव करण्यात आला. पोषण आहाराबाबत जागरूकता करण्यासाठी मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली, फॅन्सी ड्रेस स्पर्धा  रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

               राज्यातून कोल्हापूर जिल्हयाने पटकावले सर्वाधिक पुरस्कार
राष्ट्रीय पोषण माह अभियानात उत्कृष्ट कार्यासाठी सर्वाधिक पाच वैयक्तिक पुरस्कार एकटया कोल्हापूर जिल्हयाला प्रदान करण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील माले येथील अंगणवाडी सेविका अनिता साळसकर,  कागल तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका संध्या चांदणे, पन्हाळा तालुक्यातील केखले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका स्मिता चोपडे, तसेच पन्हाळा तालुक्यातील माले उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका वैशाली  शितोळे याच उपकेंद्रात कार्यरत आशा वर्कर शोभा लोहार यांना आज पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यासह भंडारा जिल्हयातील शिंदी उपकेंद्रातील खुमारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत एएनएम कार्यकर्त्या चंदा झालके, अहमदनगर जिल्हयातील संगमनेर तालुक्यातील घारगाव प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका कल्पना अंदुरे व संगमनेर प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका संगिता पवार, चंद्रपूर जिल्हयातील स्वस्थ भारत प्रेरक पुजा वेरुळकर, नाशिक जिल्हयातील दिंडोरी तालुक्यातील मु. टोटमाळ पोस्ट. गांडोळे येथील अंगणवाडी सेविका मंदा शिंदे, आशा कार्यकर्त्या पुष्पा शिंदे आणि एएनएम कार्यकर्त्या लक्ष्मी गायकवाड यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला .

                               चंद्रपूर व नाशिक जिल्हयांचा सन्मान
राज्यात जिल्हा स्तरावर उत्तम  सांघिक कार्यासाठी चंद्रपूर व नाशिक जिल्हयांना यावेळी सन्मानित करण्यात आले. चंद्रपूरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सुर्यवंशी आणि नाशिकचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनिल दुसाणे यांनी हा पुरस्कार  स्वीकारला.      

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पोषण अभियान विभागाच्यावतीने देशभरातील ३६ जिल्हे व केंद्र शासित प्रदेशांमध्ये ‘सप्टेंबर २०१८’ हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला. यात अगदी गाव पातळीपासून गरोदरमाता, स्तनदामाता यांना सकस आहार, लहान मुलांमधील कुपोषणाबाबत जागरूकता , मुलींचे सुपोषण व त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता आदी  विषयांवर  पोषण अभियानाबाबत जागरूकता कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांची नोंद पोषण अभियानाच्या संकेतस्थळावर करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्यासाठी देशभरातील विविध राज्यांना क्षेत्रिय स्तरावर वैयक्तिक आणि जिल्हा स्तरावर सांघिक असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi 
                                                             ०००००

  रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 376/ दिनांक  10.10.2018

No comments:

Post a Comment