Monday 29 October 2018

‘हौसला और रास्ते’ प्रेरणादायी लघुचित्रपट : खा. मधुकरराव कुकडे








आंतरराष्ट्रीय महोत्सवात 'हौसला और रास्ते' ठरला विशेष लक्षवेधी लघुचित्रपट     

नवी दिल्ली, 29 : ग्रामीण तरुण-तरूणींमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य संधी मिळाल्यास हा तरुण वर्ग देखील संधीचे सोने करू शकतो. त्याची प्रचिती हौसला और रास्ते या लघुचित्रपटात दिसली आहे. हा लघुचित्रपट प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रीया, भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार मधुकरराव कुकडे यांनी व्यक्त केली.

            आज महाराष्ट्र परिचय केंद्रात हौसला और रास्ते हा हिंदी लघुचित्रपट दाखविण्यात आला. यावेळी खा. कुकडे,  हौसला और रास्तेचे निर्माता चेतन भैरम, सहनिर्माता प्रशांत वाघाये, छायाचित्रकार प्रशांत चव्हाण, लघुचित्रपटातील कलाकार अतुल भांडारकर, उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योत अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर तसेच पत्रकार, कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
            हौसला और रास्ते हा लघुचित्रपट शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या कुटुंबातील समस्या या ज्वलंत विषयावर आहे. या चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासह शासनाच्या योजनांबद्दलची माहितीही देण्यात आली असल्याचे श्री कुकडे यावेळी म्हणाले.

            दिल्ली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवात हौसला और रास्ते दाखविण्यात आला असून या लघुचित्रपटास विशेष लक्षवेधी चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. या महोत्सवात जगभरातील जवळपास 55  देशातील 400 पेक्षा अधिक लघुचित्रपट दाखविण्यात आले. हा लघुचित्रपट 25 मिनीटांचा आहे. हा चित्रपटाचे चित्रीकरण भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आलेले आहे.

या लघुचित्रपटात गुजरातमधील अभिनेता मौलिक चव्हाण आणि नागपुर येथील हिमांशी कावळे, औरंगाबादचे सुरेश जोशी प्रमुख भुमीकेत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या लाखनीतील प्रसिद्ध नाट्यकलाकार संजय वनवे, उद्योजक अतुल पाटील भांडारकर, अंजली भांडारकर, तुमसर येथील सरोजलता बर्वे, स्वप्निल जांगळे, नीलेश हंबरडे यांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात काम करणा-या कलाकारांनी मानधन घेतले नाही. या पुढेही हा चित्रपट लंडन, फ्रान्स, यु.के. स्पेन येथे होणा-या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार असल्याचे श्री भैरम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment