श्री. देसाई यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन
नवी दिल्ली, १४ : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हस्तकला, अभियांत्रिकी आदी उद्योगाने गती
धरली असून आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाच्या माध्यमातून या उद्योगांना जागतिक
बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचा विश्वास राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष
देसाई यांनी आज महाराष्ट्र येथे व्यक्त
केला.
प्रगती मैदान येथे आज पासून सुरु झालेल्या
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन श्री. देसाई यांच्या
हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई, महाराष्ट्र राज्य
लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार आणि महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यावेळी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्रामध्ये उद्योग
क्षेत्रात विविधता दिसून येते यात ग्रामीण उद्योगाने आपली वेगळी छाप सोडली आहे. ग्रामीण भागात हस्तकला आणि
अभियांत्रिकी उद्योगांमध्ये गती घेतली आहे. आतंरराष्ट्रीय व्यापार मेळयाच्या
माध्यमातून राज्यातील ग्रामीण उद्योजकांना जागतिक मंच उपलब्ध झाला आहे. या
मेळयाच्या माध्यमातून देश- विदेशातील व्यापा-यांशी थेट संवाद व व्यापाराची संधीच
ग्रामीण उद्योजकांना उपलब्ध झाली आहे. या मंचासह राज्यातील ग्रामीण उद्योगाला
प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत राहील असे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील
टेक्सटाईल पार्कला उद्योगांचा उत्तम प्रतिसाद ; रोजगारात वाढ
राज्य शासनाने १० टेक्सटाईल पार्क उभारण्याचा
निर्णय घेतला त्यानुसार अमरावती मध्ये एक टेक्सटाईल पार्क उभारण्यात आला आहे. याला
उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे येथे गुंतवणूक वाढत आहे तसेच या पार्कमुळे
रोजगारातही वाढ झाल्याचे श्री देसाई यांनी सांगितले. मराठवाडा, उत्तर
महाराष्ट्रासह राज्यात उर्वरीत टेक्सटाईल पार्क लवकरच उभारण्यात येणार असल्याचेही
ते म्हणाले.
विजेवर चालणारी वाहने उत्पादन करणा-या
कंपन्यांना प्रोत्साहन
पेट्रोल व डिझेल ऐवजी देशात वर्ष २०३० पर्यंत सर्व वाहने विजेवर चालविण्यासाठी
केंद्र शासनाने धोरण आखले आहे. याची अंमलबजावणी करण्यात देशात महाराष्ट्राने
पुढाकार घेतला व धोरणही आखले आहे. राज्यात या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली
आहे. या धोरणानुसार विजेवर चालणा-या वाहनांची निर्मिती करणा-या कंपन्यांना राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. याचाच परिणाम
म्हणून राज्यात पुणे येथे जिंदाल उद्योग समुहाची जे.एस.डब्ल्यु कंपनी तर नाशिक
येथे महिंद्रा कंपनी लवकरच कामाला सुरुवात करणार आहे. नागपूर येथे ई रिक्शा निर्मितीला सुरुवात झाल्याचेही
त्यांनी सांगितले.
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या इंटरनॅशनल
ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्यावतीने दि.१४ ते २७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ३८ व्या
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “ग्रामीण भारतातील उद्योग” या
मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास
महामंडळाच्यावतीने " महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग" हे राज्याच्या उद्योग क्षेत्रातील
प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.
रचना संसद या संस्थेच्या चमुने संस्कार भारती
रांगोळीच्या धर्तीवर महाराष्ट्र दालनाची सुबक व सुदंर
सजावट केली आहे. राज्यातील ग्रामीण उद्योजकांचे १३ आणि महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचा
एक असे एकूण १४ स्टॉल्स या
ठिकाणी मांडण्यात आले आहेत. ग्रामीण
उद्योगाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी
आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघुउद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण,
विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी विषयांना
स्पर्श करणारे आकर्षक महाराष्ट्र दालन यंदा राज्याच्यावतीने उभारण्यात आले
आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या
अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
रितेश भुयार /वृत्त वि.
क्र.३९६/ दिनांक 14.11.2018
000000
No comments:
Post a Comment