Wednesday, 5 December 2018

'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' समीक्षा ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्कार





नवी दिल्ली, :  प्रसिध्द मराठी चिंतनशील लेखक डॉ. म.सु.पाटील लिखित 'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' या समीक्षा ग्रंथास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष २०१८ साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज  जाहीर झाला आहे.
रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी पत्रकार परिषदेत देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावांची  घोषणा केली.  चिंतनशील लेखक डॉ. म.सु.पाटील लिखित 'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' या समीक्षा ग्रंथाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ठ पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.  
                          'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' समीक्षा ग्रंथा विषयी 
            मौज प्रकाशनाने १८ एप्रिल २०१३ मध्ये ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. या ग्रंथात डॉ. म.सु.पाटील यांनी कलानिर्मितीच्या आदिम प्रेरणा, त्या प्रेरणांशी अनुबंध असणारे छंद, लय, आत्माविष्कार, भावक्रीडा इत्यादी विविध पैलूंचा मानसशास्त्रीय अंगाने मागोवा घेतला आहे. सर्जनशक्तीचे विकसन कसकसे होते याचा धांडोळा घेतानाच विचार, तत्वज्ञान, सौंदर्य आणि कलामीमांसा यांचे वेचक कवी आणि त्यांच्या कविता यांच्या उदाहरणांतून अभिजात आणि रोमँटिक काव्यविचाराशी निगडित असलेले नातेही ते उलगडून दाखवतात. त्याची व्याप्ती विसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वातील नवकवीच्या काहीशा वास्तवनिष्ठ आणि बुध्दिनिष्ठ कवितांपर्यंत पोचते.
            डॉ. पाटील यांच्या पी.एच.डी वर आधारित हे तिसरे पुस्तक आहे. यापूर्वी २००४ मध्ये ‘तुकाराम :अतंर्बाहय संघर्षाची अनुभवरूपे’  आणि  २००६ मध्ये  ‘ज्ञानेश्वरीचा काव्यबंध’ ही दोन पुस्तके मुंबई येथील शाब्दल प्रकाशनाने प्रसिध्द केली आहेत. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या काव्याचा अभ्यास करताना कोणता काव्य विचार उपयुक्त ठरेल याचा अभ्यास करण्याच्या शोधातून या तिस-या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. भरतमुनी आणि प्लेटो-ॲरिस्टॉटल यांच्या पासून गेल्या शतकाच्या साठ-सत्तरच्या दशकापर्यंत झालेल्या काव्यविचारांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या ग्रंथात एकूण सात प्रकरणे असून यात सर्जनाच्या प्रेरणा, कविमन, काव्यात्म अनुभव आदिंचा समावेश आहे.
                                     चित्रलिपी’ कोंकणी भाषेतील श्रेष्ठ कलाकृती
                कोंकणी कवी परेश नरेंद्र कामत यांच्या 'चित्रलिपी' या काव्य संग्रहास कोंकणी भाषेतील सर्वोत्कृष्ट कलाकृतीचा तर प्रसिध्द लेखिका चित्रा मुद्गल लिखित 'पोस्ट बॉक्स नं. २०३-नाला सोपारा' या कादंबरीस हिंदीतील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
            या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी  २९ जानेवारी २०१९ रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक ना.धो.महानोर, मधुकर वाकोडे आणि प्रा. रमेश वरखेडे  यांचा समावेश होता.                             
              
    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४१३/  दिनांक ०५.१२.२०१८ 

No comments:

Post a Comment