Saturday, 8 December 2018

शेतक-यांना केंद्रबिंदू ठरवून ऊर्जा योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न : विश्वास पाठक


नवी दिल्ली, 8 : शेतक-यांना केंद्रबिंदू ठरवून ऊर्जा योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग करित असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचे सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी आज येथे दिली.

            महाराष्ट्र सदनात  ऊर्जा विभागाव्दारे केलेले कामांची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून श्री विश्वास पाठक यांनी दिली. यावेळी महावितरणचे तांत्रिक संचालक दिनेशचंद्र साबू, दिल्लीतील ऊर्जा विभागाचे व्यवस्थापकिय संचालक प्रफुल्ल पाठक व ऊर्जामंत्र्यांचे जनसंपर्क सल्लागार विवेक जोशी उपस्थित  होते.

            यावेळी  श्री विश्वास पाठक यांनी सांगितले, महाराष्ट्र शासनाने शेतकरी हा केंद्रबिंदू ठरवून शेतक-यांना देण्यात येणा-या ऊर्जा विभागाच्या योजनांमार्फत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या राज्यातील शेतक-यांना रात्री 8 तास विना खंड वीज 1.50 रूपयें युनिटप्रमाणे  उपलब्ध करून दिली जात आहे. यासह सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणा-या काळात दिवसा 3 रूपयें युनिट प्रमाणे वीज  उपलब्ध करूण देण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना पैसे भरूनही विजेचे जोडणी मिळत नसल्याच्या तक्रारी शेतक-यांच्या असायच्या, विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांची कृषीपंपाच्या जोडणी संदर्भात अधिक तक्रारी होत्या. हे लक्षात घेता, राज्याच्या ऊर्जा विभागाने कृषीपंपाच्या जोडणीचा अनुशेष भरून काढला आणि दरवर्षी सव्वा लाख कृषी पंपांना जोडणी दिली.  आतापर्यंत 5 लाख कृषी पंपांना जोडणी दिलेली आहे. अजूनही काही प्रलंबित शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) जोडणी दिले जात आहेत. यात एक किंवा दोन शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर वापरतील, यामुळे वीजचोरीवर आळा बसेल आणि शेतकर्‍याला पूर्ण दाबाने शाश्वत वीज मिळणार आहे. ऊर्जा विभागाने घेतलेला हा या वर्षातील मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय ठरला असल्याचे श्री पाठक यांनी यावेळी सांगितले.

यासोबतच  सौभाग्य योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या आर्थिक सहयोगाचा फायदा दुर्गम भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. गडचिरोली आणि नंदूरबार या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील काही भागात अजून वीजपुरवठ्याची कामे सुरु आहेत. ही कामे डिसेंबरपर्यंत ती पूर्ण होतील आणि हा भाग ही ऊर्जामय होईल, अशी अपेक्षा श्री पाठक यांनी यावेळी व्यक्त केला.

 वीजनिर्मिती क्षमतेत वाढ आणि भारनियमन मुक्त राज्य

मागील 4 वर्षाच्या काळात महानिर्मितीची सुमारे 3360 मेगावॉट वीजनिर्मितीच्या क्षमतेतवाढ झाली आहे.यासोबतच अनेक वीज खरेदीच्या करारांमुळे मागणीएवढी वीज उपलब्ध झाली आणि राज्य भारनियमन मुक्त होण्यास मदत मिळाली. गुणवत्तापूर्ण कोळसा खरेदी, कोळसा वाहतूक, टोलिंग धोरण अशा अनेक निर्णयामुळे ऊर्जा विभागाने सुमारे एक हजार कोटींची बचत 4 वर्षात करून दाखविली. त्याचा फायदा वीजदर नियंत्रणात ठेवण्यासाठी झाला.

पारेषणच्या 6700 किमी वाहिन्या

गेल्या 4 वर्षात महापारेषणचे राज्यातील वीज वाहिन्यांचे जाळे प्रचंड सक्षम झालेले आहे. 6700 किलोमीटर हे जाळे पसरले असून 4 वर्षात 81 अतिउच्च दाबाची केंद्र निर्माण करण्यात आली. यामुळे 13 हजार 450 एमव्हीएची भर पडली. याचाच परिणाम असा की 22 ऑक्टोबर 2018 रोजी राज्याची 25 हजार मेगावॉट ही अचानक वाढलेली विजेची मागणी कोणत्याही अडचणींशिवाय पूर्ण करणे शक्य झाले. हा राज्यातील सर्वाधिक मागणीचा दिवस ठरला असून यात राज्यातील ऊर्जा विभागाची यशस्विता सिद्ध  झाली.

सौर ऊर्जा निर्मितीला चालना

आगामी काळ सौर ऊर्जेचा असून सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेऊन शासनाने व ऊर्जा विभागाने सौर ऊर्जेला चालना देण्याचे धोरण आखले आहे. शेतकर्‍यांची दिवसा विजेची मागणी लक्षात घेता राज्यातील 45 लाख शेतकर्‍यांना आगामी काळात सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ आणून 11 किलो वॅटच्या माध्यमातून सौर ऊर्जा शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. राज्यात या योजनेचे 4 पथदर्शी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील मोहदी,नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, खापा आणि अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी येथे  सुरु झाले असून त्याचा फायदा शेतकर्‍यांना मिळत आहे. याशिवाय रूफ टॉप सोलरच्या माध्यमातून शासकीय कार्यालये, शाळा, पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, घरगुती वापरासाठी लागणारी वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून निर्मिती करणे सुरु झाले आहे.याशिवाय 1000 मेगावॉटचे ऊर्जा संवर्धन धोरण, ग्राम विद्युत व्यवस्थापक, दीनदयाल योजना, आयपीडीएस-2, उद्योगांना वीजदरात सवलत, लोक वस्त्यांना 100 टक्के विद्युतीकरण, ऑनलाईन वीजबिल प्रक्रिया, इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेईकल, एमओडी असे अनेक ग्राहकोपयोगी निर्णय ऊर्जा विभागाने घेतले असल्याकडे श्री विश्वास पाठक यांनी यावेळी लक्ष वेधले.

घारापुरीत पोहोचली वीज

मुंबईजवळ समुद्रातील घारापुरी हे बेट पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द  आहे. या बेटावर वीज नसल्यामुळे  पर्यटकांना दुपारीच मुंबईला परत यावे लागत असे,  महावितरणाच्या प्रयन्तांनी  समुद्रतळाखालून 22 किलोमीटर केबल टाकून तीन रोहित्रे उभारून 22 फेब्रुवारी 2018 रोजी घारापुरी बेटाला वीजपुरवठा केला आणि 215 ग्राहकांना चोवीस तास वीज उपलब्ध करून दिले.

No comments:

Post a Comment