Saturday, 5 January 2019

राजपथावर महाराष्ट्राचा ‘छोडो भारत’ चित्ररथ



            
नवी दिल्ली, 5 : राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने 1942 च्या चळवळीची हाक देणारे मुंबई येथील ‘ऑगस्टक्रांती मैदानावरील छोडो भारत चळवळ’ वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे.

यावर्षी भारतदेशाच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनी इंडियागेट वरील राजपथावर देशातील 15 राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होणार आहे. देशभरातून एकूण 29 राज्यांनी  राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती पैकी विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 15 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे. 
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राच्यावतीने प्रदर्शित होणा-या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. दरवर्षी राजपथावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुणे यांच्यासह गणमान्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. पथसंचलानात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे.
 सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षाचे निमित्त साधून यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने मुंबई येथील ‘ऑगस्टक्रांती  मैदानावरील  छोडो भारत  चळवळ’  दर्शविणारा  चित्ररथ  राजपथावर प्रदर्शित होणार आहे.  
                         
                          असा असणार चित्ररथ
चित्ररथाच्या पुढील भागात राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांचा दृढ निश्चय व करूणामयी स्वभाव दर्शविणारी  मोठी प्रतिमा उभारण्यात येणार आहे. स्वदेशीचे वस्तुंचे प्रतिक असणारा 'चरखा'  आणि मुंबईची खास ओळख 'गेट वे ऑफ इंडिया' च्या मोठया प्रतिमाही चित्ररथावर  उभारण्यात येणार आहेत. तसेच 1942 मध्ये  तत्कालीन गवालीया टँक अर्थात ऑगस्ट क्रांती मैदानवर झालेले 'छोडो भारत चळवळी' ची भव्यता दर्शविणारा  जनसागर चित्ररथाच्या दोन्ही बाजुस  विविध  म्युरल्सच्या  माध्यमातून  दर्शविण्यात येणार आहे.
चित्ररथ व त्याच्या आजुबाजुला एकूण 35 कलाकार असतील. 'छोडो भारत चळवळी’चे महत्वपटवून देणा-या गिताची  धूनही  राजपथावर  या  चित्ररथासह  सादर होणार आहे.
सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालक स्वाती काळे यांच्या निरीक्षणात चित्ररथ बांधणीचे कार्य सुरु आहे. राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई  यांनी केले असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली येथील कॅन्टॉनमेंट भागातील रंगशाळेत देखना चित्ररथ उभारला जाणार आहे.  
                             महाराष्ट्र सात वेळ  प्रथम क्रमांकाचा मानकरी
       महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा असून राज्याने सादरीकरणासाठी आतापर्यंत सात वेळा प्रथम क्रमांक पटकवला आहे. यापूर्वी 1980 मध्येही राज्याच्यावतीने शिवराज्याभिषेक दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शीत केला होता यास प्रथम पारितोषीक मिळाले होते. 1983 मध्ये बैल पोळा या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर 1993 ते 1995 असा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित पंढरीची वारी आणि 2018 मध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा'  चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला  ही उल्लेखनीय बाब आहे.      
                      
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                     http://twitter.com/micnewdelhi
                                                                *****

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.05/  दिनांक ५.१.२०१९ 

No comments:

Post a Comment