‘ब्रिटीश धून’ ऐवजी यावर्षीपासून राजपथवर वाजणार ‘मार्शल धून’
नवी दिल्ली,24 : भारतीय
लष्कारासाठी तयार केलेली पहिली शंखनाद ‘मार्शल धून’ ही शास्त्रीय संगीतावरआधारीत जगातील
पहिली धून आहे. यावर्षीपासून प्रजासत्ताक दिनी राजपथावर ही धून वाजविण्यात येणार आहे.
हा सर्व अनुभव म्हणजे माझ्या संगीत साधनेचे सर्वोच्च यशच आहे अशा भावना गायिका व संगीतकार
डॉ. तनुजा नाफडे यांनी आज येथे व्यक्त केल्या.
महाराष्ट्र परिचय केंद्रात आज डॉ. नाफडे
यांचा पत्रकारांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला, याप्रसंगी त्या बोलत होत्या. नागपूरच्या
धरमपेठ महाविद्यालयात संगीताच्या प्राध्यापिका असलेल्या डॉ. नाफडे यांनी संगीतबध्द
केलेली पहिलीच भारतीय ‘मार्शल धून’ नुकत्याच पार पडलेल्या ‘लष्कर दिनी’ देशाला समर्पित
झाली. यावर्षी राजपथावरील 70 व्या प्रजासत्ताक दिनी प्रथमच ‘ब्रिटीश मार्शल धून’ ऐवजी
भारतीय ‘मार्शल धून’ वाजणार आहे.
भारतीय लष्कराला मिळाली पहिली
भारतीय धून
स्वातंत्र्य प्राप्ती पासून भारतीय लष्कराच्या
विविध कार्यक्रमात व भारतीय प्रजासत्ताक दिनी राजपथावर आयोजित करण्यात येणा-या गौरवपूर्ण
कार्यक्रमात आतापर्यंत ब्रिटीश लष्काराची मार्शल धूनच वाजविण्यात येत असे. मात्र, भारतीय लष्काराच्या महार रेजिमेंटच्या प्लॅटीनम
ज्युब्लीप्रंसगी मेजर जनरल ओक यांनी 2016 मध्ये या रेजिमेंटसाठी गीत तयारकरण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी त्यांनी गीत रचण्याची
जबाबदारी ब्रिगेडीयर विवेक सोहेल यांना सोपवली होती .
गीत
तयार झाल्यावर मेजर जनरल ओक यांनी हे गीत संगीतबध्द करण्याची जबाबदारी डॉ. तनुजा नाफडे
यांना दिली. तयार झालेली धून महार रेजिमेंटच्या प्लॅटीनम ज्युब्ली समारंभात वाजविण्यात
आली. याप्रसंगी उपस्थित लष्काराच्या वरिष्ठ अधिका-यांनाही ही धून आवडली व तेथेच त्यांनी
डॉ. नाफडे यांना ही धून भारतीय लष्कराच्या मार्शल धून मध्ये परावर्तीत करण्याची सूचना
केली. त्यानुसार लष्काराने हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठविला व तो लगेच मंजूर
करण्यात आला.डॉ. नाफडे यांनी भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारीत ही धून तयार केली व
मुंबई येथील यशराज स्टुडीओ मध्ये याचे यशस्वी लाईव्ह रेकॉर्डींगही करण्यात आले. ही
धून 6 मिनीटांची आहे.
नुकतेच दिल्ली येथे पार पडलेल्या ‘लष्करदिना’
च्या कार्यक्रमात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत उपस्थितीत प्रथम आधिकारीकरित्या ही धून वाजविण्यात
आली. या कार्यक्रमात लष्काराच्या 14 बँडच्या एकूण 252 कलाकारांनी ही धून सादर केली. समारंभपूर्वक लोकर्पण झाल्यामुळे यावर्षी पासून राजपथ येथील प्रजासत्ताक
दिनासह देशभर होणा-या लष्काराच्या कार्यक्रमात हीच धून वाजविण्यात येणार आहे.
जगाच्या इतिहासात शास्त्रीय
संगितावर आधारीत पहिली धून
डॉ. नाफडे यांनी भारतीय शास्त्रीय
संगीतातील किरवानी, विलासखानी-तोडी आणि भैरवी
या तीन रांगांतील स्वरांची गुंफण करून ही मार्शल धून तयार केली आहे. जगाच्या इतिहासात प्रथमच शास्त्रीय संगीतावर
आधारीत मार्शल धून बनवण्याचा हा पहिला प्रसंग असल्याचे डॉ. नाफडे यांनी सांगितले. भारतीय
शास्त्रीय संगीतातील रागांसह वेस्टर्न कॉड आणि वेस्टन हार्मनीचीही या धुनला जोड देण्यात
आली आहे.
0000
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.34/दि.24.01.2019
No comments:
Post a Comment