Sunday, 10 March 2019

लोकसभा निवणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात ७ टप्प्यात होणार मतदान महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यात मतदान




नवी दिल्ली, १० मार्च :  देशात १७ व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक ११ एप्रिल ते १९ मे २०१९ या कालावधित एकूण  ७ टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून २३ मे २०१९ रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात ११, १८ ,२३ आणि २९ एप्रिल  या तारखांना पहिल्या चार टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत.
            केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून १७ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा आणि अशोक लवासा यावेळी उपस्थित होते.  निवडणूक कार्यक्रमांच्या या  घोषणेपासूनच देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू  झाली आहे. 
महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यात मतदान
        महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी एकूण चार टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. ११ एप्रिल रोजी पहिल्या  टप्प्यात राज्यातील एकूण ७ लोकसभा मतदार संघांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. दुस-या टप्प्यात १८ एप्रिल रोजी राज्यातील १० मतदार संघांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. २३ एप्रिल रोजी तिस-या टप्प्यात राज्यातील एकूण १४ मतदार संघांसाठी तर  २९ एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात  राज्यातील उर्वरित १७ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
देशात 7 टप्प्यात मतदान
देशात 11 एप्रिल रोजी  पहिल्या  टप्प्यात 20 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 91 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 18 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 25मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 26 मार्च रोजी  उमेदवारी  अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 28 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 
देशात 18 एप्रिल रोजी  दुस-या  टप्प्यात 13 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 97 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 19 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 26 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 27 मार्च रोजी  उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 29 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 
 देशात 23 एप्रिल रोजी  तिस-या  टप्प्यात 14 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 115 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 8 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
देशात 29 एप्रिल रोजी चौथ्या  टप्प्यात 9 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 71 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी 2 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
देशात 6 मे रोजी पाचव्या टप्प्यात 7 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 51 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  10  एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
देशात 12 मे रोजी सहाव्या टप्प्यात 7 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 59 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  16  एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
देशात 19 मे रोजी सातव्या टप्प्यात 8 राज्य व  केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 59 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान  घेण्यात येणार आहे. यासाठी  22  एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.

महाराष्ट्रात असे होणार टप्पानिहाय मतदान
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघासाठी एकूण ४ टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल २०१९ रोजी  ७ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये  वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ - वाशिम या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.  

दुस-या टप्प्यात १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे, यामध्ये  बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर  या १० लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.  

तिस-या टप्प्यात २३ एप्रिल २०१९ रोजी  मतदान होणार आहे, यामध्ये  जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या  १४ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.  

चौथ्या आणि शेवटच्या  टप्प्याचे मतदान  २९ एप्रिल २०१९ रोजी होणार आहे,  यामध्ये  नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण-मुंबई, मावळ, शिरुर आणि शिर्डी या १७  लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.  

आचार संहिता काळात असे असणार नियम
निवडणूक काळात आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. निवडणूक प्रचार काळात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारासाठी ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. तर पर्यावरण पुरक प्रचार साहित्य व माध्यमांचा उपयोग करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
संवेदनशील मतदार संघांवर व्हिडीओग्राफी,सीसी टीव्ही आणि वेबकास्टींग करण्यात येणार आहे.   प्रसार माध्यमांमधून आचार संहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणपत्र नियंत्रण केंद्र  उभारण्यात येणार आहे.
सोशल मिडीयाद्वारे प्रचारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता
निवडणूक काळात प्रसारमाध्यमांवरून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये व अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना फेसबुक, ट्वीटर, युटयूब, व्हाट्सअप आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठीत करण्यात आलेल्या सोशल मिडीया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्राचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य   करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मिडीयावरून प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.
***************
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic 
दयानंद कांबळे/रितेश भुयार /वृत विशेष क्र.92 / दि.10.03.2019


No comments:

Post a Comment