Monday, 11 March 2019

मला मिळलेली ‘पद्मश्री’ हा नाटय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान : प्रा वामन केंद्रे












         भारतीय नाटकांना जागतिक स्तरावर लौकिक मिळवून देणार                 
नवी दिल्ली, दि. 11 : ‘पद्मश्री’ पुरस्कार हा माझ्या नाटय क्षेत्रातील कामगिरीला मिळालेला प्रतिसाद असून नाटय क्षेत्रात पोटतिडकीने कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा सन्मान असल्याच्या भावना प्रसिध्द नाटय कलाकार व नाटय दिग्दर्शक तथा राष्ट्रीय नाटय विद्यालयाचे माजी संचालक प्रा.वामन केंद्रे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.  
            उत्तमोत्तम काम करून भारतीय नाटकाला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला. प्रा. केंद्रे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. यापार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्र परिचय केंद्रातआमंत्रीत करण्यात आले. उपसंचालक दयानंद कांबळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. बिहार परिचय केंद्राचे उपसंचालक लोकेश झा, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेमधून प्रा. केंद्रे यांनी पद्मश्री पुरस्काराविषयीच्या भावना व्यक्त केल्या व नाटयक्षेत्रातील प्रवासाविषयी माहिती दिली.
            'पद्मश्री पुरस्कारामुळे खूप आनंद होत आहे मात्र, हा पुरस्कार माझा एकटयाचा सन्मान नसून मराठी व भारतीय नाटय क्षेत्रात  पोटतिडकीने कार्यरत असलेल्या सर्वांचा सन्मान असल्याचे', प्रा. केंद्रे म्हणाले. आतापर्यंत नाटय शिक्षण, नाटय दिग्दर्शन, नाट आयोजन आणि नाटक संस्था उभ्या करण्यात दिलेल्या योगदानाला केंद्र शासनाने दिलेला हा प्रतिसाद आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर जबाबदारी वाढली आहे. उत्तमोत्तम नाटय निर्मिती करून जागतिक पटलावर मराठी नाटक व भारतीय नाटकांचे प्रभुत्व सिध्द करणार असल्याच्या मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उत्तमोत्तम नाटय निर्मिती करून भारतीय संस्कृती जगातील संवेनशील कलवंतापर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत विद्वानांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार. आदिवासी कला, लोककला, शास्त्रीय नाटक, संस्कृत नाटक, आधुनिक नाटकांना जगात योग्यरित्या प्रसारीत करून त्यांना न्याय देण्यासाठी कार्य करणार असल्याचेही प्रा. केंद्रे म्हणाले. भारतीय संस्कृतीमध्ये मोठी शक्ती असून जगाच्या उंबरठयावर ही संस्कृती सकसपणे मांडल्यास भारतदेश जगात कलागुरु म्हणून उदयाला येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.            
              महाविद्यालयीन जीवनातच निश्चित झाली नाटय क्षेत्रातील कार्याची दिशा
कला शाखेच्या दुस-या वर्षाला असताना 'प्रेमा तुझा रंग कसा'  या नाटकात पहिली भूमिका केली. बीड ला या नाटकाचा प्रयोग झाला होता 25 हजार प्रेक्षक या प्रयोगासाठी जमले होते. या नाटकातील माझा अभिनय व त्यास मिळलेला प्रतिसाद पाहता नाटय क्षेत्रातच करीर करण्याचे निश्चित केले. पुढे 1979 ते 1982 या कालावधित दिल्लीतील राष्ट्रीय नाटय विद्यालयातून (एन.एस.डी.) नाटकाचे शिक्षण पूर्ण केले. एनएसडीची फेलोशिफ मिळाली व 1983 आणि 1984 असे दोन वर्ष केरळ मध्ये होतो. या काळात केरळमधील नाटक, लोककला शिकायला मिळाली.
            एनएसडी मधून उत्तीर्ण झाल्यावर ‘राजदर्शन’ हे हिंदीतील पहिले नाटक आणि ‘झुलवा’ हे मराठीतील पहिले नाटक दिग्दर्शीत केले. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांनी रशियन भाषेतील नाटकावरून रूपांतरीत केलेले ‘एक झुंज वा-याशी’ या नाटकाचे दिग्दर्शन, ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांचे ‘दुसरा सामना’ आणि ‘नातीगोती’ या नाटकांचे दिग्दर्शन केले. या तिन्ही नाटकांना  वर्ष 1989-90 मध्ये राज्य शासनाचे पहिले तीन पुरस्कार मिळाले. 
            नाटयक्षेत्रातील आतापर्यंतच्या कारकिर्दीत अर्थपूर्ण नाटक केली व प्रेक्षकांनी ती उचलून धरली. हिंदी रंगभूमीवरील ‘जानेमन’ या नाटकात किन्नरांच्या समस्या मांडल्या. त्याचा परिणाम होऊन देशाच्या संसदेत हा विषय पोहचला व याविषयी कायदा झाला. ‘गजब तेरी अदा’ या हिंदी नाटकातून बायकांनी आपल्या नव-यांविरूध्द पुकारलेला बंड मांडला तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. पानीपतच्या दुस-या युध्दातील मराठयांच्या परभवावर आधारीत ‘रणांगण’ नाटक रंगभूमीला दिले. दलीत चळवळीच्या काळातील ‘आवर्त’, ‘थांबा रामनाथ’ या नाटकांतील नायक साकारता आले. आतापर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील एकूण 75 नाटकांचे दिग्दर्शन केले असून यातील प्रत्येक नाटकांचे कमीतकमी 500 प्रयोग झाले आहेत याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.   
            प्रा. केंद्रे यांनी सलग 35 वर्ष नाटयशिक्षण दिले आहे. तसेच, भारत व विदेशात 300 हून अधिक नाटय प्रशिक्षण विषयक कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले आहे.          
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                    
                                           0000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 95 / दिनांक  11.03.2019




No comments:

Post a Comment