Friday 15 March 2019

महाराष्ट्रात ११ लाख तरूण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क



         
राज्यात ८ कोटी ७३ लाख मतदार
नवी दिल्ली, 15 : मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय असून राज्यातील 11 लाख99  हजार527 तरूण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
            केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवरीत ही माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात  मतदारांची  एकूण संख्या 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 आहे. राज्यात 18 ते 19 वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणा-या तरूणांची संख्या 11 लाख99हजार 527  आहे. हे तरुण प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. देशात 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या 1कोटी 50लाख 64हजार 824 आहे.  
                                             मतदार नोंदणीत महिलांचीही आघाडी 
                                                  4 कोटी  16 लाख महिला मतदार
             मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदारही आघाडीवर आहेत. राज्यातील पुरुष व महिला मतदारांचे प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागे नोंदणीकृत 911 महिला मतदार असे आहे. राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी  4 कोटी 57लाख 1 हजार 877 पुरुष तर  4 कोटी 16 लाख 25 हजार 950 महिला मतदार आहेत. राज्यात 2 हजार 83 नोंदणीकृत तृतीय पंथी मतदार आहेत.  
                    एक हजार लोकसंख्येमागे मतदार नोंदणीचे प्रमाणही राज्यात उल्लेखनीय आहे. राज्यात एक हजार लोकसंख्ये मागे 710 नोंदणीकृत मतदार आहेत. तर राज्यात एकूण 48 लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात  एकूण 95 हजार 475 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे.            
                                             देशात 89 कोटी 87लाख मतदार
                         देशातील 29 राज्य आणि 7 केंद्रशासीत प्रदेशांमध्ये आजमितीस एकूण 89 कोटी 87लाख 68 हजार 978 मतदार आहेत. यामध्ये 46 कोटी 70 लाख 4 हजार 861  पुरुष मतदार आहेत तर 43 कोटी 16 लाख 89 हजार 725 महिला मतदार आहेत. देशभरात 31 हजार 292  तृतीय पंथी मतदार आहेत.
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                    
                                           0000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 101 / दिनांक  15.03.2019




No comments:

Post a Comment