नवी
दिल्ली, 12 : वर्धा येथे शिक्षण घेत असताना वाचनाची
आवड लागली, महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे साहित्य वाचले व यातूनच समाजकार्याची
प्रेरणा मिळाली अशा भावना पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे यांनी आज महाराष्ट्र
परिचय केंद्रात व्यक्त केल्या.
डॉ. रविंद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय केंद्रात या दांपत्यासोबत संवादाचा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला. उपसंचालक दयानंद कांबळे यांनी डॉ. रवींद्र कोल्हे यांना तर जनसंपर्क अधिकारी
अमरज्योतकौर अरोरा यांनी डॉ. स्मिता कोल्हे यांना शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी झालेल्या
अनौपचारिक चर्चेमधून कोल्हे दांपत्यांनी अमरावती जिल्हयातील मेळघाट या आदिवासीभागात
केलेल्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा प्रवास उलगडला.
मुळचे शेगावचे डॉ. रविंद्र कोल्हे यांचे
वडील रेल्वेत लिपीक होते. 10 व्या वर्षीच डॉ. कोल्हे यांना हृदय विकाराचे निदान झाले.
योग्य उपचार झाल्याने त्यांचा पुनर्जन्म झाल्याचे त्यांनी सांगितले. 10 वी नंतर गावात
शाळा नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता डॉ. कोल्हे वर्धेला गेले. याठिकाणी
ते वाचनालयात तासन तास बसून महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे साहित्य वाचले व त्यातूनच
त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. पुढे वैद्यकीय शाखेची पदवी घेवून मेळघाटातील
आदिवासी लोकांमध्ये वैद्यकीय सेवा देण्याचे निश्चित केले.
तत्कालीन चिखलदरा आणि सद्याच्या धारणी
तालुक्यातील बैरागड येथे समाजकार्याला सुरुवात केली. वर्षभर सेवा दिल्यानंतर पुन्हा
पदव्युत्तर शिक्षणासाठी डॉ. कोल्हे मुंबईला गेलो आणि पुन्हा मेळघाटातील आदिवासी लोकांना
वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांनी मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न
समोर आणला. बीबीसी सारख्या जागतिक वृत्तसंस्था आणि मराठीतील प्रतिथयश वृत्तपत्रांनी
याची दखल घेतली.
पुढे डॉ. स्मिता यांनी खांदयाला खांदा
लावत डॉ. रविंद्र कोल्हे यांना या कार्यात मोलाचे सहकार्य केले. कोल्हे दांपत्य डॉक्टर
म्हणून आले मात्र, सोबतच लोकांनी शेतीविषयक प्रश्नही त्यांच्यासमोर मांडले. मग वैद्यकीय
सेवेसोबतच शेतीक्षेत्राततही हे दांपत्य काम करू लागले. पारंपारिक शेती सोबत त्यांनी
मेळघाटात
केळी,
पपई, हळद, टरबूज,खरबूज या पिकांची ओळख करून दिली. परिणामी स्थानिक आदिवासींनी शेतीत
नवनवीन प्रयोग केले व त्यांना याचा फायदा झाल्याचे डॉ. रविंद्र कोल्हे यांनी सांगितले.
सुरुवातीच्या काळात भाषेची अडचण आली. या
भागात रस्ते नव्हते, वीज नव्हती आता हळूहळू सर्व गोष्टी या भागात पोहचल्या आहेत. आमच्या
कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचल्यावर समाजातून मदतीचे हात आले. आता आमच्या दवाखान्यात
शस्त्रक्रियेसाठी आधुनिक यंत्र उपलब्ध आहेत. दवाखान्यात विनाशुल्क डोळयांची शस्त्रक्रीया
केली जाते. लवकरच फॅको यंत्रही दाखल होणार असून येथे शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध होणार
असल्याचे डॉ. रविंद्र कोल्हे यांनी सांगितले.
मेळघाटातील आदिवासी पुढारलेले
: डॉ. स्मिता कोल्हे
मेळघाटात
मुख्यत्वे कोरकू आणि गोंड या आदिवासी जमाती आहेत. येथील लोक मायाळू आहेत व मदतीस तत्पर
असतात. हा समाज अशिक्षित असला तरी विचारांनी पुढारलेला असल्याचे डॉ. स्मिता कोल्हे
यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मेळघाटातील आदिवासींमध्ये हुंडा प्रथा नाही. मुला मुलींना समानतेची वागणूक
दिली जाते. चो-या होत नाहीत. लींग भेद नसल्याने येथे स्त्रीभृण हत्या होत नाही. मुल-मुली
स्वत:चा जोडीदार ठरवतात. आपापल्या आई- वडिलांचा सांभळ करताता त्यामुळे येथे अनाथाश्रम
नाहीत. महिलेकडे वाईट नजरेने बघितले जात नाही, त्यांना सन्माने वागवले जाते. या सर्व
चांगल्या गोष्टींमुळे आम्ही याभागात उत्तम कार्य करू शकलो अशाही त्या सांगतात.
डॉ. रविंद्र कोल्हे यांनी लग्नासाठी चार
अटी घातल्या होत्या. पहिली अट 400 रूपये महिन्यांमध्ये संसार चालविण्याची तयारी,
40 कि.मी पायी चालण्याची तयारी, 5 रूपयांमध्ये लग्न आणि चौथी अट प्रसंगी भीक मागण्याची
तयारी, अशी होती. मात्र, आपला सामाजिक क्षेत्रात कार्यकरण्याची आधीपासूनच तयारी असल्याने
आपण या अटी मान्य करत डॉ. रविंद्र कोल्हे यांच्याशी विवाह केल्याचे डॉ. स्मिता कोल्हे
सांगतात . पतीच्या खांदयाला खांदा लावून मेळघाटातील आदिवासी जनतेची सेवा केला . या सर्व कार्याचा आनंद व समाधान असल्याच्या भावनाही
त्यांनी व्य्कत केल्या.
डॉ. कोल्हे दांपत्यांला दोन मुले असून मोठा मुलगा रोहित
हा वैरागड येथे शेती करतो व स्थानिक आदिवासींनाही शेती विषयक नव प्रयोगांविषयी प्रशिक्षण
देतो. तर लहान मुलगा राम हा वैद्यकीय शाखेचे पदवी शिक्षण घेत असून त्यालाही मेळघाटच्या
आदिवासी लोकांसाठी सेवा करण्याची इच्छा असल्याचे डॉ. कोल्हे दांपत्यांनी सांगितले.
दरवर्षी डिसेंबर व मे महिन्यामध्ये डॉ.
कोल्हे दांपत्य देशभरातील युवकांसाठी कोलूपूर येथे निवासी श्रमसंस्कार शिबीर आयोजित
करतात. या शिबीराच्या माध्यमातून युवकांना
मेळघाटातील वनसंपदा, श्रमसंस्कार कार्यक्रम व सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचे
मार्गदर्शन दिले जाते. यास तरूणांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी
सांगितले.
0000
रितेश भुयार
/वृत्त वि. क्र. 97 / दिनांक 12.03.2019
No comments:
Post a Comment