Monday 24 June 2019

‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत’ कोल्हापूर जिल्हा देशात द्वितीय महाराष्ट्र 5व्या स्थानावर तर सातारा जिल्ह्याला विशेष पुरस्कार






नवी दिल्ली,24 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने देशभर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत’(ग्रामीण) कोल्हापूर जिल्ह्याने देशातून दुसरा क्रमांक पटकविला आहे. राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर राहिला तर सातारा जिल्हा विशेष पुरस्काराचा मानकरी ठरला. आज केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेच्या’ विजेत्यांचा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन अय्यर, सहसचिव अरुण बरोका यावेळी मंचावर उपस्थित होते.
केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने 1 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान देशभरातील राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे’ आयोजन केले होते. देशातील 614 जिल्ह्यांमधील 1 कोटी 32 लाख प्रतिस्पर्ध्यांनी यात भाग घेतला. या स्पर्धेच्या माध्यमातून शौचालयांना आकर्षकरित्या रंगविण्यात आले व या शौलालयांवर स्वच्छता जागृतीबद्दल संदेशही देण्यात आले. स्थानिक पातळीवर झालेल्या कामाची नोंद मंत्रालयाच्या पोर्टलवर देण्यात आली. या आधारावर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांनी प्रत्यक्ष जिल्ह्यांना भेट देवून पाहणी केली व विजेत्यांची निवड केली.

कोल्हापूर जिल्हा ठरला देशात दुसरा
आजच्या कार्यक्रमात ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत’ उत्कृष्ठ ठरलेल्या देशातील सर्वोत्तम तीन जिल्ह्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्या आले. साडेचार लाख शौचालय स्वच्छ सुंदर करणा-या कोल्हापूर जिल्ह्याला दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी हा पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते स्वीकारला. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व ब्लॉक आदींमध्ये एकूण साडे चार लाख शौचालय रंगविण्यात आली. विशेष म्हणजे 28 जानेवारी रोजी जिल्ह्यात ‘स्वच्छता दिवस’ साजरा करण्यात आला, या एकाच दिवशी जिल्ह्यात दीड लाख शौचालय रंगविण्यात आली. या कार्याची दखल म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रात 26 लाख स्वच्छ सुंदर शौचालय
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सुंदर शौचालय मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात 26 लाख 48 हजार 26 शौचालये रंगविण्यात आली. राज्याच्या या कार्याची दखल घेत देशातून पाचव्या क्रमांकाच्या पुरस्काराने राज्याचा सन्मान करण्यात आला. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव तथा प्रकल्प संचालक अभय महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सातारा जिल्ह्याला विशेष पुरस्कार
स्वच्छता क्षेत्रात अग्रेसर असणा-या सातारा जिल्ह्याने आजच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमातही मोहर उमटवली. स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत सक्रीय सहभाग घेवून उत्कृष्ठ कार्य करणा-या देशातील सात जिल्ह्यांमध्ये सातारा जिल्ह्याने स्थान मिळविले आहे. आजच्या कार्यक्रमात विशेष पुरस्काराने जिल्ह्याला सन्मानीत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानक्रुंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सातारा जिल्ह्यामध्ये साडे तीन लाख शौचालय रंगविण्यात आली आहेत. याच कार्याची दखल म्हणून सातारा जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment