Friday, 14 June 2019

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर




   सुशीलकुमार शिंदे यांना ‘युवा पुरस्कार’ तर सलीम सरदार मुल्ला यांना ‘बाल साहित्य पुरस्कार’

नवी दिल्ली, १४ : मराठी भाषेतून कवी सुशीलकुमार शिंदे यांना ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतय’ या काव्य संग्रहासाठी ‘युवा पुरस्कार’ तर लेखक सलीम सरदार मुल्ला यांना ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीसाठी  ‘बालसाहित्य पुरस्कार’ आज साहित्य अकादमीने  जाहीर केला आहे.

साहित्य क्षेत्रातीत प्रतिष्ठीत  संस्था म्हणून गौरव असणा-या साहित्य अकादमीने ‘साहित्य अकादमी पुरस्कार २०१९’ ची  आज घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कांबर यांच्या अध्यक्षतेखाली अगरतळा येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २३ भाषांकरिता ‘युवा पुरस्कार’ तर २२ भाषांकरिता ‘बाल साहित्य पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

            युवा पुरस्कारासाठी २३ प्रादेशिक भाषांमधील ११ काव्य संग्रह, ६ लघु कथा, ५ कादंबरी आणि एका समीक्षात्मक पुस्तकाची निवड करण्यात आली. मराठी साहित्य मधून ठाणे (प.) येथील कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतय’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. ५० हजार रूपये आणि कांस्यपदक असे पुरस्काराचे स्वरूप असून साहित्य अकादमीच्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता गणेश आवटे, प्रफुल्ल शिलेदार आणि श्रीकांत देशमुख यांचा परिक्षक मंडळामध्ये समावेश होता. 
            बाल साहित्य पुरस्कारासाठी २२ प्रादेशिक भाषांमधील  साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली. मराठी साहित्यामधून सलीम सरदार मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीची  बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ५० हजार रूपये आणि कांस्यपदक असे पुरस्काराचे स्वरूप असून  यावर्षी १४ नोव्हेंबर या बालदिनी विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता  रंधीर शिंदे, अतुल पेठे आणि  मिना गवानकर यांचा परिक्षक मंडळामध्ये समावेश होता. 

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :                    http://twitter.com/micnewdelhi                                      
                                             000000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.132/  दिनांक  14.6.2019 




No comments:

Post a Comment