मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती
नवी दिल्ली, 25 : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर आज येथील निगमबोध घाट स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, विदेशी पाहुणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
श्री.जेटली यांचे शनिवारी दुपारी येथील एम्स रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथील निगमबोध घाट स्मशानभूमीत अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते, त्यांनीही श्री.जेटली यांना श्रध्दांजली वाहिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी (19 ऑगस्ट) एम्स रूग्णालयात जाऊन श्री. जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
दरम्यान, रविवारी सकाळी 10.30 वाजतापासून दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयात श्री जेटली यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दुपारी 1 वाजता भाजपा मुख्यालयातून निगमबोध घाट स्मशानभूमी पर्यंत श्री.जेटली यांची अंत्ययात्रा निघाली. श्री. जेटली यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय मार्गाच्या दुतर्फा मोठ्या संख्येने जनसमूह जमला होता. ‘जेटलीजी अमर रहे’ अशा घोषणा आणि पुष्प वर्षावांनी वातावरण शोकमग्न व भाऊक झाले होते. बहादुर शहा मार्ग, दिल्ली गेट, राजघाट मार्गाने अंत्ययात्रा थेट निगमबोध घाट स्मशानभूमी येथे पोहचली.
अंत्यविधीसाठी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनी ही पुष्पचक्र वाहिले.यावेळी उपस्थित विविध देशांच्या प्रतिनिधींनी पुष्पचक्र वाहिले.
श्री जेटली यांच्या पत्नी संगिता जेटली , मुलगी सोनाली जेटली यांच्यासह नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलगा रोहन जेटली यांनी मुखाग्नी दिली. संपूर्ण देशाने हा भावूक प्रसंग दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या मनात साठवून श्री जेटली यांना अखेरचा निरोप दिला.
गेल्या काही दिवसांपासून श्री जेटली यांची प्रकृती खालावली होती. फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यामुळे 9 ऑगस्टला सकाळी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा . http://twitter.com/ MahaGovtMic
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.199 / दिनांक 25.08.2019
No comments:
Post a Comment