Tuesday, 27 August 2019

महाराष्ट्राचा जलतरणपटू प्रभात कोळीला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर





नवी दिल्ली, 26 : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी यास, आज मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला आहे . 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार -2018’ ची आज घोषणा करण्यात आली. विविध साहसी प्रकारांत एकूण 6 खेळाडुंची निवड या पुरस्कारासाठी झाली असून महाराष्ट्राचा युवा जलतरणपटू प्रभात कोळी याच्या सागरी जलतरणातील साहसाची नोंद घेवून त्याला हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

5 लाख रूपये, स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून राष्ट्रपती भवनात 29 ऑगस्ट 2019 रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण’ समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
            सागरी जलतरणातील महाराष्ट्राचा हिरा, प्रभात कोळी

        नवी मुंबई येथील नेरूळ भागातील प्रभात कोळी या 19 वर्षाच्या युवा जलतरणपटूने नुकतेच दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनचा 8 कि.मी. चा समुद्र पार केला. हाच, त्याचा जगातील मान्यता प्राप्त आठवा समुद्र किनारा पार करण्याचा विक्रमही ठरला. न्यूझीलंडमधील कूक स्ट्रीट, इंग्लीश खाडी, कॅटलिना, कैवी, सुगारु, नॉर्थ चॅनल आणि जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे एकूण सात खडतर टप्पे प्रभातने यापूर्वी पूर्ण केले आहेत. त्यातील काही टप्प्यांत सर्वात तरूण खेळाडू म्हणून त्याच्या नावाची नोदं झाली आहे  .  

प्रभात हा कोळी कुटुंबातला, त्यामुळे समुद्राशी त्याचे घट्ट नाते आहे. वडील राजू कोळी मासेमारी व्यवसायात आहेत. प्रभातने 2012 मध्ये ‘धरमतर ते गेटवे’ हे सर्व नव्या सागरी जलतरणपटूंचे प्राथमिक आव्हान लिलया पार केले. वयाच्या 14 व्या वर्षीच ‘कासा ते खंदेरी’ हा धोकादायक मानला जाणारा सागरी पट्टा पार करून प्रभातने आपल्यातील साहसी जलतरणपटूची चुणूक जगाला दाखवून दिली होती. वडील राजू आणि आई शिल्पा कोळी यांनी स्वत:चे रो हाऊस विकून प्रभातच्या सागरी जलतरणावर लक्ष केंद्रीत केले, त्याला या क्षेत्रात प्रोत्साहन दिले. परिणामी, 2014 पर्यंत प्रभातने भारतातील काही समुद्रमार्ग पार केल्यानंतर 2015 मध्ये इंग्लिश खाडीचे खडतर आव्हान पूर्ण केले. त्याआधी, अराऊंड जर्सी हा 66 कि.मी. चा अतिशय थंड पाण्याचा पट्टा ओलांडून पराक्रम केला.      
देशात विविध साहसी खेळांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणा-या खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याची दखल म्हणून दरवर्षी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने  ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.       

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                 000000000
 रितेश भुयार/वि.वृ.क्र 201 / दि. 27-08-20019










No comments:

Post a Comment