नवी दिल्ली, 28 : सांगली जिल्हयातील ‘येरळावाणी’ आणि वर्धा येथील ‘एमगिरी’ समुदाय
रेडिओ केंद्रांना उत्तम कार्यक्रम निर्मितीसाठी आज केंद्रीय माहिती व प्रसारण
मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते समुदाय रेडिओ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने
येथील डॉ.आंबेडकर राष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात श्री. जावडेकर यांच्या
हस्ते वर्ष ‘समुदाय रेडिओ राष्ट्रीय पुरस्कार 2018-19’ चे वितरण करण्यात आले.
यावेळी मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते.
यावेळी
एकूण पाच श्रेणींमध्ये वर्ष 2018आणि
2019 या दोन वर्षांसाठी एकूण 30 पुरस्कार प्रदान करण्यात आले. सांगली
जिल्हयातील ‘येरळावाणी’ समुदाय केंद्राला वर्ष 2019 साठी ‘स्थानिक संस्कृती
जोपासना’ श्रेणीत दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या रेडिओ केंद्राचे संचालक उदय गोडबोले यांनी
पुरस्कार स्वीकारला. 30 हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे
पुरस्काराचे स्वरूप आहे.
वर्धा
येथील ‘एमगिरी’ समुदाय रेडिओ केंद्राला वर्ष 2018 साठी ‘संकल्पना आधारीत’ श्रेणीत तिस-या
क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले. या रेडिओ केंद्राचे समन्वयक अमोल देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला. 20
हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
येरळावाणीवरिल
‘जान गालीच्या’विषयक कार्यक्रम ठरला श्रेष्ट
जत तालुक्यातील माडग्याळी मेंढीच्या
खास लोकरीपासून तयार होणारा ‘जान गालीचा’ त्याची निर्मिती प्रक्रिया व या
हस्तकलेच्या परंपरेविषयी येरळावाणी समुदाय रेडिओ केंद्राने कार्यक्रम प्रसारीत केला होता. हा कार्यक्रम
देशभरातून सर्वोत्कृष्ट ठरला म्हणूनच ‘स्थानिक संस्कृती जोपासना’ श्रेणीत या
कार्यक्रमाला दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराचा बहुमान मिळाला. सांगली जिल्हयातील जत तालुक्याच्या
जालिहाड गावात ‘येरडा प्रोजेक्ट सोसायटीच्या’ माध्यमातून एफएम 91.2 फ्रिक्वेंशीवर ‘येरळावाणी’
हा समुदाय रेडिओ चालविण्यात येतो. जत तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त 22
गावांमध्ये विविध विकास कामांमध्ये कार्यरत येरडा सोसायटीने 2011 मध्ये ‘येरळावाणी’ समुदाय रेडिओ सुरु केला.
एमगिरी केंद्रावरील ‘उंच माझा झोका’ची राष्ट्रीय पातळीवर दखल
वर्धा आणि यवतमाळ
जिल्हयातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी कार्यरत ‘एकल
महिला संघटनेतील’700 महिलांच्या प्रेरणादायी स्वानुभवावर आधारीत एमगिरी समुदाय
रेडिओ केंद्राच्या ‘उंच माझा झोका’ या कार्यक्रमाची या पुरस्काराच्या रुपाने
राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.
‘संकल्पना आधारीत’ श्रेणीत या केंद्राने तिसरा क्रमांक पटकविला आहे. केंद्रीय
सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्याशी संलग्न असलेल्या वर्धा येथील महात्मा
गांधी ग्रामीण उद्योगिकरण संघटनेने 2013 मध्ये 90.4 फ्रिक्वेंशीवरील ‘एमगिरी’ या
समुदाय रेडिओ केंद्राची सुरुवात केली. गेल्या दीड वर्षा पासून या केंद्राहून
उंचमाझा झोका हा साप्ताहिक कार्यक्रम प्रसारीत करण्यात येत आहे.
महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000000
रितेश भुयार/वि.वृ.क्र 203 / दि. 28-08-20019
No comments:
Post a Comment