Tuesday, 20 August 2019

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा













        मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार
नवी दिल्ली, 21 :  क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली .महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी  द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस मधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.  
            केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१९ ची घोषणा करण्यात आली. यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलेटिक खेळाडू दीपा मलिक या दोघांना जाहीर झाला आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी १९ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर तीन ज्येष्ठ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दोन संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाले आहेत . तर चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाला  ‘मौलाना अबूल कलाम आझाद चषक’ जाहीर झाला आहे.
       गेल्या चार दशकांपासून गरीब मुलांना हॉकीचे नि:शुल्क प्रशिक्षण देताहेत मर्झबान पटेल
          हॉकी प्रशिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर मुर्झबान पटेल हे गेल्या चार दशकांपासून मुंबईत गोरगरीब मुलांना हॉकीचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. युवराज वाल्मीकी, ॲड्रीन डिसुजा, देवेंद्र वल्मिकी , गॅवीन फरेरा आदी ऑल्म्पिीक हॉकी खेळाडू मर्झबान पटेल यांच्या तालमीतून घडले आहेत. मर्झबान पटेल यांनी हॉकी प्रशिक्षक म्हणून दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेवून त्यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे .
                           नितीन किर्तने यांच्या टेनिस खेळातील योगदानाची दखल 
मुंबईतील नितीन किर्तने यांनी वयाच्या 5 व्या वर्षापासूनच टेनिस खेळायला सुरुवात केली. त्यांनी देश-विदेशातील मानाच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत देशाचे प्रतिनिधीत्व केले. डावखुरे खेळाडू असणारे किर्तने यांनी एकेरी आणि दुहेरी टेनिस स्पर्धेत सहभाग घेवून उत्तम रँकींग मिळविली आहे. टेनिसमधील  त्यांच्या योगदानासाठी त्यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.
             आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या विविध क्रीडा क्षेत्रातल्या प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड केली जाते. क्रीडा क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्यांना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात येते. 
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा .   http://twitter.com/MahaGovtMic                             
0000   
रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.196 / दिनांक  20.08.2019



No comments:

Post a Comment