Friday, 9 August 2019

‘भोंगा’ सर्वोत्तम मराठी चित्रपट















 मराठी चित्रपटाला विविध श्रेणीत 9 पुरस्कार
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा
नवी दिल्ली, 9 :  66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा झाली. सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान ‘भोंगा’ या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय पाणी, ‘नाळ’, ‘चुंबक’, ‘तेंडल्या’, ‘खरवस’ आणि ‘आई शप्पथ’ हे मराठी चित्रपट विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम ठरले असून मराठी चित्रपटाला 9 पुरस्कार मिळाले आहेत. 'नाळ’ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला तर स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला .       
                                                 
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रसिध्द दिग्दर्शक राहुल रवैल आणि सदस्यांनी आज शास्त्रीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2018 च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. ‘अंधाधून’ चित्रपटासाठी अभिनेता अन्शुमन खुराणा आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटासाठी  विकी कौशल यांना विभागून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'महानती' या तेलगू चित्रपटातील भूमिकेसाठी किर्थी सुरेश या अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी अभिनेते स्वानंद किरकिरे यांना 'चुंबक' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला.                                
                              भोंगा : सर्वोत्तम मराठी  चित्रपट
          प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. मराठी भाषेसाठी  भोंगा या चित्रपटाची  सर्वोत्तम चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केले असून मंदार नलिनी प्रोडक्शनची  निर्मिती आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास रजत कमळ आणि 1 लाख रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि पर्पपल पेबल पिक्चर निर्मित पाणी हा मराठी चित्रपट पर्यावरणावरील सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास प्रत्येकी रजत कमळ आणि 1 लाख 50 हजार रूपये  पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.

                                             नाळ : दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट
सुधाकर रेड्डी येंकटी दिग्दर्शित आणि मृदगंध फिल्म्स निर्मित नाळदेशातील दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. स्वर्ण कमळ आणि 1 लाख 25 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

                 श्रीनिवास पोकळे आणि स्वानंद किरकिरे यांच्या अभिनयाचा सन्मान
'नाळ’ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास  सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे.  सर्वोत्तम बालकलाकारासाठी यावर्षी चार बालकलाकारांची निवड झाली आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच प्रसिध्द अभिनेते स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.                                  
                             ‘तेंडल्या’ : सर्वोत्तम ऑडिओग्राफीचा मानकरी
‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम ओडिओग्राफीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटात ध्वनीच्या माध्यमातून छोटया शहराच्या वैविद्यपूर्ण रंगछटा दर्शविण्यात आल्या आहेत. लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट गौरव वर्मा यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
                                              नॉनफिचर मध्येही मराठीचा दबदबा                                
                   नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली  गौतम वझे दिग्दर्शित 'आई शप्पथ' या चित्रपटाला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वर्णकमळ आणि 1 लाख 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘खरवस’ हा सर्वोत्तम लघु काल्पनिक चित्रपट ठरला आहे. आदित्य जांभळे यांनी चित्रपटाचे   दिग्दर्शन केले असून श्री महळसा प्रोडक्शन पोंडाची निर्मिती आहे.  प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे  स्वरूप आहे. केदार दिवेकर यांच्या संगीत दिग्दर्शनातील 'ज्योती'  चित्रपटाला सर्वोत्तम संगित दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.                                 
                                  हेल्लारो’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
हेल्लारो' हा गुजराती भाषेतील चित्रपट देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. 'बधा हो' हा हिंदी चित्रपट सर्वोत्तम मनोरंजक चित्रपट ठरला तर 'पद्मन' हा हिंदी चित्रपट सामाजिक विषयावरील सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. ‘ओंडाल्ला येराडाल्ला’ या कन्नड भाषेतील चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिला जाणारा नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर झाला आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
                                                     00000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.184 /  दिनांक  8.08.2019 








No comments:

Post a Comment