Wednesday 25 September 2019

राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’














          
नवी दिल्ली, 25 : एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला आज केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. नाशिक जिल्हयातील शेतकरी बापु साळुंखे यांनाही प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात सुरु असलेल्या 6 व्या राष्ट्रीय जल सप्ताहाच्या दुस-या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारांचे’ वितरण करण्यात आले. जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारीया  आणि विभागाचे सचिव यु.पी.सिंह, राष्ट्रीय जल अभियानाचे संचालक जी. अशोक कुमार  यावेळी मंचावर उपस्थित होते.
           
केंद्र शासनाच्यावतीने वर्ष 2011 पासून देशभर ‘राष्ट्रीय जल अभियान’ राबविण्यात येते, यावर्षी प्रथमच या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणारे विविध राज्यांचे विभाग, खाजगी क्षेत्रातील संस्था आणि  व्यक्तींना ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय जल अभियानाअंतर्गत ठरवून देण्यात आलेल्या 5 उद्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण 9 श्रेणींमध्ये 23 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
गोदावरी खोरे आणि उपखोरे अंतर्गत येणा-या धरणांच्या पाण्याचे एकात्मिक जल व्यवस्थापन करून जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनिय योगदानासाठी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन श्रेणी अंतर्गत दुस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रूपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 उपलब्ध पाण्याचा प्रभावी उपयोग करून जलव्यवस्थापन व जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी नाशिक जिल्हयातील चांदवड तालुक्याच्या वडनेर (भैरव) येथील  शेतकरी बापु साळुंखे यांना शेतक-यांच्या श्रेणीत प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. 2 लाख रूपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नाशिक जिल्हयाच्या दुष्काळी भागातील शेतकरी श्री. साळुंखे यांच्यामालकीच्या एकूण 25 एकर शेतीतील केवळ 2 एकर शेतीलाच पाणी उपलब्ध होते. मात्र, या स्थितीवर मात करण्यासाठी  वर्ष 2004 पासून सुक्ष्म जलसिंचन पध्दतीचा प्रभावी अवलंब करून श्री. सांळुखे यांनी आपली 25 एकर शेती ओलीताखाली आणली असून या जमीनीवर ते द्राक्ष उत्पादन घेत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारासाठी घेण्यात आली.                  
*****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.225 / दि.25.09.2019
                                                  

No comments:

Post a Comment