Thursday, 5 September 2019

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान













       
नवी दिल्ली , : अहमदनगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागुल, मुंबई येथील अणु उर्जा केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक डॉ. ए.जेबीन जोएल आणि पुणे येथील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज  राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. रजतपदक, मानपत्र आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

            केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्यसाधून देशातील शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2018-19 ने गौरविण्यात आले.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक, राज्यमंत्री संजय धोत्रे आणि शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सचिव रिना रे यावेळी मंचावर उपस्थित होत्या.     
                     
                      डॉ बागुल यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून घडविला बदल  

 डॉ. अमोल बागुल यांनी शिक्षणातील नव-नवीन उपक्रमांचा अवलंब करून आपल्या शाळेत महत्वपूर्ण बदल घडविले आहेत. ‘नासा किड्स क्लब’या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले . तसेच , ‘ई-काँटेंट’ द्वारे विद्यार्थ्यांना ‘योगा’ सारख्या अन्य शारिरीक शिक्षणाचा परिचय घडविला आहे. संगीत कलेचा प्रभावीपणे उपयोग करून त्यांनी विद्यार्थ्यांना कला व संस्कृतीचे ज्ञान दिले. त्यांनी 7 हजार 500 विद्यार्थ्यांना बासरीवर राष्ट्रगीत शिकविले आहे. एकाच शैक्षणिक वर्षात 276 शैक्षणिक उपक्रम राबविण्याची किमया त्यांनी केली आहे. वर्ल्ड टिचर फोरमच्या माध्यमातून होणा-या शैक्षणिक उपक्रम आणि संकल्पनांच्या आदन-प्रदानात त्यांनी  सहभाग घेतला आहे . त्यांनी 200 हून अधिक शैक्षणिक प्रशिक्षण घेतले असून 50 हून अधिक विशेष अभ्यास कार्यक्रमही  पूर्ण केले आहेत. डॉ. बागुल यांच्या शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना मानाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारने गौरविण्यात आले.  

डॉ. जोएल यांनी तयार केले  शिक्षण पूरक 82 उपकरण
मुंबई येथील अनुशक्तीनगर परिसरात स्थित अणु उर्जा केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक डॉ. ए.जेबीन जोएल हे उपक्रमशील शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषय सहज व सोप्या पध्दतीने समजावून देण्यासाठी त्यांनी शिक्षण पुरक एकूण 82 नवे उपकरण तयार केली आहेत. व्यवाहारीक उदाहरणाद्वारे अभ्यासक्रमातील विविध संकल्पना समजावून देण्याची त्यांची त-हा विद्यार्थीप्रिय आहे. यात, व्हायोलियन वादनाद्वारे ‘लवचिकता’  (इलॅस्टीसीटी) आणि लाठीकाठी द्वारे ‘जडत्व’ ( मुमेंट ऑफ इनर्शिया)समजावून सांगण्याचे त्यांचे प्रयोग कौतुकास्पद ठरले आहेत. डॉ. जेबीन यांनी तयार केलेल्या ‘क्युआर कोड’ आधारीत आयसीटी उपक्रमाचेही कौतुक झाले. शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसह डॉ. जेबीन यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.  

           राधिका दळवी यांनी सर्वांगिण शिक्षणावर दिला भर  
पुणे येथील हडपसर परिसारातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना सर्वांगिण शिक्षण देण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुल्याधारीत शिक्षणावर भर देवून विद्यार्थ्यांना संवेदनशील, वक्तशीर व जबाबदार बनविण्याकरिता त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबविले व त्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग घडवून आणला. राधिका दळवी यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
   
 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000000
रितेश भुयार/वृ. वि. क्र. 214 /दिनांक 5. 09. 2019



No comments:

Post a Comment