Friday, 6 September 2019

‘स्वच्छता महोत्सव’ : उत्कृष्ट संवाद उपक्रमासाठी महाराष्ट्राला विशेष पुरस्कार













      
              चंद्रपूर जिल्हयातील किरण बगमारे ठरल्या उत्कृष्ट स्वच्छाग्रही
                                                   
नवी दिल्ली , : शाश्वत स्वच्छता मोहिमेंतर्गत उत्कृष्ट संवाद उपक्रमासाठी आज केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते महाराष्ट्राला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रपूर जिल्हयातील किरण बगमारे या महाराष्ट्रातील उत्कृष्ट स्वच्छाग्रही ठरल्या असून त्यांनाही गौरविण्यात आले.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला स्वच्छ प्रतिष्ठित स्थळासाठी तर सोलापूर जिल्हयातील तमलवाडी टोल प्लाझा ला स्वच्छ टोल प्लाझा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   
           
            केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्यावतीने आज येथील विज्ञान भवनात ‘स्वच्छता महोत्सव -2019’चे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया, पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर यावेळी मंचावर उपस्थित होते.

                        या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला शाश्वत स्वच्छता मोहिमेंतर्गत उत्कृष्ट संवाद उपक्रमासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे आणि पाणी व स्वच्छता सहायक संस्थेचे संचालक राहुल चाकोरे यांनी हा  पुरस्कार स्वीकारला.

                            किरण बगमारे ठरल्या महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट स्वच्छाग्रही  
या कार्यक्रमात देशभरातील सर्वोत्कृष्ट 27 स्वच्छाग्रही महिलांना सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर जिल्हयातील ब्रह्मपुरी तालुक्याच्या जुगनाळा गावातील किरण बगमारे यांचा महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट स्वच्छाग्रही म्हणून सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले  उपस्थित होते.

किरण बगमारे यांनी 2 हजार लोकवस्तीच्या जुगनाळा गावाला हागणदारीमुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच, गावातील महाविद्यालयीन मुलांचा युवकगट आणि 19 महिला बचत गटांतील 215 महिलांचा स्वतंत्र महिलागट तयार करून गावात स्वच्छता जागृतीचे कार्य केले. गावातील सार्वजनिक शौचालयांवर देखरेख ठेवून येथे स्वच्छता व अनुषांगीक बाबीं पुरविल्या. श्रीमती बगमारे यांच्या स्वच्छता विषयक कार्याची दखल घेवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
                         मुंबई येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला देशातील स्वच्छ प्रतिष्ठित स्थळाचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मध्य रेल्वेचे मुख्य अभियंते श्यामसुंदर कालरा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
            सोलापूर जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील  जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वरील तमलवाडी टोल प्लाझा ला स्वच्छ टोला प्लाझा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000000
रितेश भुयार/वृ. वि. क्र. 216 /दिनांक 6. 09. 2019

No comments:

Post a Comment