Friday, 18 October 2019

" बार्टी " च्या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचा दिल्ली येथे शुभारंभ




                                                  

नवी दिल्ली दि.18 : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न भावी सनदी अधिकाऱ्यांनी करावा आणि सामाजिक परिवर्तन करावे  असे आवाहन श्री.दादा इधाते यांनी केले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि ईग्नायटेड माईंडस, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.18 व 19 ऑक्टोंबर 2019 रोजी "दोन दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा" युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिर्व्हसिटी, रोहिणी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी दादा इधाते बोलत होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम मध्ये पार पडलेल्या उद्घाटन समारंभास श्री.दादा इधाते, श्री.कैलाश कणसे, महासंचालक, बार्टी, श्री.दिनेश दासा, अध्यक्ष, गुजरात लोकसेवा आयोग, श्री.योगेश सिंह, कुलगुरू, दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिर्व्हसिटी, डॉ.दयानंद सोनसळे, श्री.विनय पत्राळे, अध्यक्ष, ईग्नायटेड माईंडस, पुणे, श्रीमती प्रणाली दहिवाळ, प्रकल्प संचालक, यूपीएससी प्रशिक्षण विभाग, बार्टी, पुणे, श्री.शशांक खांडेकर, ईग्नायटेड माईंडस, पुणे आदी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिर्व्हसिटीचे कुलगुरू श्री. योगेश सिंह, यांनी युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी "सनदी अधिकारी झाल्यावर पदाने मोठे व्हाल पण मनाने पण मोठे व्हा ", असा सल्ला दिला. आपल्या मोठेपणातून आई-वडिलांसाठी, समाजासाठी काही केले तर तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे व्हाल, असे सांगून या विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.
बार्टीचे महासंचालक श्री.कैलास कणसे यांनी बार्टीच्या विविध योजनांचा परिचय उपस्थितांना करून दिला. युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएस अशा पदांसोबतच विविध राज्य सरकारी स्पर्धा परिक्षांकडेही लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन केले. बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील ज्या उपजातीमधील उमेदवारांना आज पर्यंत युपीएससी, एमपीएसी प्रशिक्षणाचा लाभ मिळाला नाही, अशा सर्व उमेदवारांसाठी बार्टीमार्फत विशेष प्रयत्न करून त्यांना प्रशिक्षणाच्या संधी उपलबध करून दिल्या आहेत, असे सांगितले. या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी उत्तम व्यक्तिमत्व घडवून यशस्वी सनदी अधिकारी व्हावे, असे सांगितले.     
ईग्नायटेड माईंडस, पुणे चे अध्यक्ष श्री.विनय पत्राळे यांनी या कार्यशाळेची भूमिका विषद केली आणि याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले. गुजरात लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री.दिनेश दासा यांनी एकाच वेळी मुलाखत, मुख्यपरीक्षा आणि पूर्व परीक्षा यांचा बहुआयामी अभ्यास कमी वेळेत कसा पूर्ण करावा? याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड करतांना उमेदवारांमधील कोणत्या गुणांचा कस लागतो? याच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनामुहे उपस्थित विद्यार्थी भारावून गेले.
मान्यवरांचे आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक श्रीमती प्रणाली दहीवाळ यांनी केले. याच वेळी बार्टीचा प्रत्येक विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, न्याय, बंधुता या तत्वांचा वैश्विक प्रसारासाठी कार्यरत असेल अशी ग्वाही त्यांनी मान्यवरांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शशांक खांडेकर यांनी केले.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic 
दयानंद कांबळे/वृत विशेष क्र.235  दि.18.10.2019


No comments:

Post a Comment