Friday, 8 November 2019

महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार


  


सोशल मिडियाच्या प्रभावी वापरासाठी प्रथम क्रमांक
 
नवी दिल्ली, दि.8 : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मिडीयाच्यामाध्यमातून दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्ससाठी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राला आज प्रथम क्रमांकाच्या ‘प्रभासाक्षी’ सोशल मिडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशातील आघाडीचे हिंदी न्युज पोर्टल ‘प्रभासाक्षी’ च्या वतीने समाजमाध्यमांचा प्रभावी व योग्य वापर करणा-या देशातील संस्थांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्राला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील कॉन्स्टिटयूशन क्लब मध्ये आयोजित ‘प्रभासाक्षी’च्या 18 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय, खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि उपसंपादक रितेश भुयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधित प्रभासाक्षीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले . यात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयांच्या समाजमाध्यमांद्वारे देण्यात येणा-या अपडेट्सचेही सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात योग्य व प्रभावीरित्या समाज माध्यमांद्वारे अपडेट्स देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने बाजी मारली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अधिकृत(प्रमाणीत) ट्विटर हँडल असणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानीत एकमेव कार्यालय असून फक्त याच कार्यालयाने लोकसभा निवडणूक कालावधित राज्यातील लोकसभा मतदारसंघ निहाय अचूक व प्रभावी माहितीचे अपडेट दिले. ट्विटरद्वारे 1952 पासून ते 2014 पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीची वैविद्यपूर्ण आकडेवारी देण्यात आली तसेच या कालावधितील संबंधित अपडेट वृत्तही देण्यात आले. त्यासाठी इन्फोग्राफीक्स , व्हिडीयो आदिंचा प्रभावी वापर करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिनही ट्विटर हँडलहून दररोज महत्वाच्या माहितीचे अपडेट्स देण्यात येत असून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार कार्यालयाच्या सोशल मिडीयाशी जोडले गेले आहेत. ट्विटर सोबतच कार्यालयाचे फेसबुकपेजेस(तीन), ब्लॉग, युटयूब चॅनेल, वॉटस्अप ग्रुप आणि एसएमएस सेवेच्या माध्यमातून प्रसार माध्यम आणि जनतेला वेळोवेळी माहिती देण्यात येते. समाजमाध्यमांद्वारे अचूक, योग्य व वेगवान माहिती देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने आघाडी घेतली असून यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री. ब्रिजेशसिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

यावेळी ‘हिंदी और क्षेत्रीय भाषाओं की डिजीटल मीडिया पर बढती भूमिका’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात वरिष्ठ पत्रकार तथा इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनीकेशनचे माजी महासंचालक के.जी.सुरेश, उत्तर प्रदेशचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय, खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांनी विचार मांडले.

******

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twiter.com/MahaGovtMic
http://twitter.com/MahaMicHindi
http://twitter.com/micnewdelhi
रितेश भुयार/वृ.वि.क्र. 244 / दि.08.11.2019

No comments:

Post a Comment