Tuesday, 24 December 2019

महाराष्ट्राला चार आकाशवाणी पुरस्कार












                   पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग देशात सर्वोत्कृष्ट  

नवी दिल्ली, 24 : माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज आकाशवाणीच्या वार्षीक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुणे आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाला देशातील सर्वोत्कृष्ट वृत्त विभागाच्या पुरस्कारासह महाराष्ट्राला एकूण चार आकाशवाणी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            कोल्हापूर आकाशवाणीच्या अभियांत्रिकी कार्याचा आणि पुणे आकाशवाणीच्या महिला विषयक कार्यक्रमाने पुरस्कार पटकाविला.तर मुंबई आकाशवाणीच्या विविध भारती सेवेतील उदघोषकाला सर्वोत्तम उद्घोषकाचा बहुमान मिळाला आहे.

येथील आकाशवाणी भवनाच्या सभागृहात आज ‘वर्ष 2016 आणि 2017 च्या आकाशवाणी पुरस्कारांचे’ वितरण करण्यात आले. प्रसार भारतीचे अध्यक्ष एस.सुर्यप्रकाश, मुख्यकार्यकारी अधिकारी शशी एस. व्येंपट्टी आणि आकाशवाणीचे महासंचालक एफ. शेहरयार यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी देशातील आकाशवाणी केंद्राना  विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

          पुणे आकाशवाणी केंद्राच्या तंत्रज्ञान कुशल वापराची दखल
        नवीनतम तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करणा-या पुणे आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाला देशातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक वृत्त विभागाच्या पुरस्काराने (वर्ष2017) सन्मानित करण्यात आले. पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाचे प्रमुख तथा उपसंचालक नितीन केळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशतील पहिले पेपरलेस प्रादेशिक वृत्त विभाग होण्याचा मान या केंद्राने मिळविला आहे. नवीन तंत्रज्ञाचा वापर करून बातम्या अधिकाधिक चांगल्या करण्याबरोबरच नव-नवीन गॅझेट्सच्या माध्यमांतून या बातम्या श्रोत्यांपर्यंत पोचवण्यात या केंद्राने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

                  अभियांत्रिकी श्रेणीत सर्वोत्कृष्ट अभियंतेचा पुरस्कार (2016) आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या तत्कालीन अभियंत्या शुभा धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापूर आकाशवाणीमध्ये डिजीटायजेशनसह  कंसोल आणि  मिक्सर इंन्स्टॉलेशन, कॉम्प्युटर नेटवर्कींग आणि ॲडमिनीस्ट्रेशनमध्ये  केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

               पुणे आकाशवाणीच्या ‘ओ वुमनिया’ कार्यक्रमाला महिलांसाठीच्या सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाचा पुरस्कार (वर्ष 2017) प्रदान करण्यात आला. कार्यक्रम अधिकारी तेजश्री कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘ओ वुमनिया’ कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या स्वच्छतागृह विषयक प्रश्नांबाबत जनजागृती करण्यात आली आहे. 
                आकाशवाणीने प्रथमच सर्वोत्कृष्ट उद्घोषकाचा पुरस्कार सुरु केला असून या पुरस्काराने (वर्ष 2017)  मुंबई आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या उद्घोषक ममता सिंह यांना सन्मानित करण्यात आले.    
                
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
                                                     00000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.273 /  दिनांक  24.12.2019 

Monday, 23 December 2019

‘भोंगा’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान
















 मराठी चित्रपटाला विविध श्रेणीत 10 पुरस्कार
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
नवी दिल्ली, 23 :  66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे  आज  उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ‘भोंगाया चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतचपाणी’, ‘नाळ’, ‘चुंबक’, ‘तेंडल्या’, ‘खरवसआणिआई शप्पथया मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपटांसाठी एकूण 10 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नाळचित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा तर प्रसिध्द  अभिनेते स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.          

माहिती प्रसारण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञानभवनात आयोजित कार्यक्रमात आजराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार -2018’ चे वितरण करण्यात आले. माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, मंत्रालयाचे सचिव रवि मित्तल आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीचे निवडक परिक्षक यावेळी मंचावर उपस्थित होते.
     ‘अंधाधूनचित्रपटासाठी अभिनेता अन्शुमन खुराणा आणिउरी : सर्जिकल स्ट्राईकचित्रपटासाठी   अभिनेता विकी कौशल यांना विभागून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'महानटी' या तेलगू चित्रपटातील भूमिकेसाठी किर्थी सुरेश या अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला..                               
                     
                              भोंगाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा बहुमान
          प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेसाठी  ‘भोंगाया चित्रपटाला  सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक तथा मंदार- नलिनी प्रोडक्शनचे  शिवाजी लोटन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि 1 लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि पर्पल पेबल पिक्चर्स निर्मितपाणीचित्रपटाला पर्यावरणावरील सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले..  रजत कमळ आणि 1 लाख 50 हजार रूपये  असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

                     दिग्दर्शक  सुधाकर रेड्डी येंकटी यांना नाळचित्रपटासाठी पुरस्कार
 दिग्दर्शकाचा पदार्पणातील चित्रपट म्हणूननाळया चित्रपटालाइंदिरा गांधी पुरस्कारानेगौरविण्यात आले. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी येंकटी आणि निर्माता तथा मृदगंध फिल्म्सचे नागराज मंजुळे यांनी हा पुरस्कार स्वीकारलाप्रत्येकी स्वर्ण कमळ आणि 1 लाख 25 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

                 श्रीनिवास पोकळे आणि स्वानंद किरकिरे यांच्या अभिनयाचा सन्मान
'नाळचित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे  ला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी चार बालकलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.                                 
                             तेंडल्याठरला सर्वोत्तम ध्वन्यांकनाचा मानकरी
तेंडल्याया मराठी चित्रपटाला सर्वोत्तम  ध्वन्यांकनाचा (लोकेशन साऊंड) पुरस्कार प्रदान करण्यात  आला. या चित्रपटात ध्वनीच्या माध्यमातून छोटया शहराच्या वैविद्यपूर्ण रंगछटा दर्शविण्यात आल्या आहेत. लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट गौरव वर्मा यांनी  हा पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
                                              नॉनफिचर मध्येही मराठीचा सन्मान                               
                   नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली 'आई शप्पथ' या चित्रपटाला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक गौतम वझे यांनी पुरस्कार स्वीकारला. स्वर्णकमळ आणि 1 लाख 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘खरवसहा सर्वोत्तम लघु काल्पनिक चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक आदित्य जांभळे  आणि निर्माती संस्था श्री म्हाळसा प्रोडक्शन पोंडा यांना या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे  स्वरूप आहे. 'ज्योतीचित्रपटासाठी सर्वोत्तम संगित दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगित दिग्दर्शक केदार दिवेकर यांनी पुरस्कार  स्वीकारला. रजत कमळ आणि 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.                               
                                              ‘हेल्लारोसर्वोत्कृष्ट चित्रपट
हेल्लारो' या गुजराती  चित्रपटाला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'बधाई हो' या हिंदी चित्रपटाला सर्वोत्तम मनोरंजक चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'पद्मन' या हिंदी चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘ओंडाल्ला येराडाल्लाया कन्नड भाषेतील चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा  नर्गिस दत्त पुरस्कार प्रदान करण्यात आला.
                      अमिताभ बच्चन यांना 29 डिंसेबरला दादासाहेब फाळके पुरस्कार
भारतीय चित्रपटसृष्टीवर गेल्या 50 वर्षांपासून कसदार अभिनयाने गारूड घालणारे महानायक अमिताभ बच्चन यांना येत्या 29 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मानाचादादासाहेब फाळके पुरस्कारप्रदान करण्यात येणार असल्याचे माहिती  प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या समारंभात सांगितले.
महानायक अमिताभ बच्चन यांना ‘50 वा दादासाहेब फाळके पुरस्कारजाहीर झाला आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते  आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
                                                     00000

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.271 /  दिनांक  23.12.2019