Tuesday, 17 December 2019

महाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख



नवी दिल्ली, 17 :  केंद्रशानाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे  नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून ले.जनरल नरवणे हे त्यांचा पदभार स्विकारतील.

श्री. नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे. यापदावरील ते दुसरे मराठी अधिकारी असतील. यापूर्वी जनरल अरूण कुमार वैद्य या मराठी अधिका-याला 1983 ते 1986 या कालावधीत देशाच्या लष्कर प्रमुखपदाचा बहुमान मिळाला आहे.

 केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने सेवा ज्येष्ठतेनुसार श्री नरवणे यांची देशाचे आगामी लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. मूळ पुण्याचे असलेले श्री नरवणे सध्या भारतीय लष्काराचे  उपप्रमुख असून विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत येत्या 31 डिसेंबरला निवृत्त होत असल्याने    लष्करप्रमुख म्हणून त्यांना बढती देण्यात येत आहे. 
                            ले. जनरल मनोज नरवणे यांच्या विषयी
ले.जनरल नरवणे यांनी याच वर्षी सप्टेंबर महिन्यात व्हाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याआधी  ते सैन्याच्या पूर्वेकडच्या भागाची जबाबदारी सांभाळत होते. भारताच्या चीनशी संलग्न सुमारे 4,000 कि.मी. लांब सीमेच्या रक्षणाची जबाबदारी नरवणे यांनी समर्थपणे सांभाळली आहे.

श्री. नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या. ले.जनरल नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील 'ज्ञानप्रबोधिनी'त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून 1980 मध्ये ते '7 सीख लाइट इन्फंट्री'मधून लष्करात दाखल झाले.

जम्मू-काश्मीर मधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे 'इन्स्पेक्टर जनरल', स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील 'जनरल ऑफिसर इन कमांडिंग', लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. श्री. नरवणे यांनी सोपविण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी चोखपणे पूर्ण पाडत आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली.
                महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.269/  दिनांक 17.12.2019 


No comments:

Post a Comment