Wednesday 22 January 2020

महाराष्ट्राच्या अथर्व लोहार आणि देवेश भईया ला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’





               प्रजासत्ताकदिन पथसंचलनात सहभागी होण्याचा बहुमान

नवी दिल्ली, 22 : कला व संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी अथर्व लोहार तर गणितातील सृजनात्मक कार्यासाठी देवेश भईया या महाराष्ट्रातील दोन बालकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताकदिनी होणा-या पथसंचलनात हे बालक सहभागी होणार आहेत.
            केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020चे वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती राणी, राज्यमंत्री देबाश्री चौधरी आणि सचिव रबिंद्र पंवार यावेळी उपस्थित होते.  पदक, 1 लाख रूपये  आणि  प्रमाणपत्र  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.   

गेल्यावर्षी पासूनच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ पुरस्कार सुरु केला. सृजनात्मकता, शौर्य, सामाजिक सेवा, क्रीडा, कला व संस्कृती  क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणा-या 49 बालकांना यावेळी ‘बाल शक्ती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. अथर्व लोहार  आणि  देवेश भईया या  महाराष्ट्रातील बालकांनाही यावेळी गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त  सर्व बालकांना यावर्षी राजपथावर होणा-या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात सहभागी होण्याचा बहुमानही मिळणार आहे.

मुळचा सातारा जिल्हयातील फलटन येथील आणि  सद्या मुंबईतील अंबरनाथ भागात राहणारा  अथर्व लोहार  या  11 वर्षाच्या बाल तबला वादकाने कला व सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या उल्लैखनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लहानपणापासूनच तबल्याची आवड  असणा-या  अथर्वने  या कला प्रकारात  नैपूण्य  मिळविले  व  देशाचे  नावही  उज्ज्वल  केले. थायलंड  आणि बँकॉक येथे पार पडलेल्या जागतिक तबलावादन स्पर्धेत अथर्वने भारताचे प्रतिनिधीत्व केले. स्वरसाधना समिती या नामांकीत संस्थेच्या 2018 मध्ये आयोजित 53 व्या वार्षीक शास्त्रीय संगीत व नृत्याच्या स्पर्धेत अर्थवने तबला सोलो वादनात सुवर्ण पदक पटकाविले आहे.

 जळगाव येथील गणितज्ज्ञ  देवेश भईया  या 13 वर्षाच्या बालकाने गणितात सृजनात्मक योगदान दिले आहे. मुंबई सायंस टिचर्स  असोशिएशनच्यावतीने आयोजित होमी भाभा ज्युनियर सायंटिस्ट  परिक्षेत  देवेशने सुवर्ण पदक पटकाविले आहे. साऊथइस्ट एशियन मॅथेमॅटीकल ऑल्म्पीयाडमधे सादर केलेल्या शोध प्रबंधासाठी देवेशला  सुवर्ण पदक मिळाले आहे. इग्नायटेड माइंडलॅब परीक्षेत  सर्वात जास्त गुण मिळविणारा देवेश हा पहिला भारतीय  ठरला आहे.   
           
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                                                            0000000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.28/दि.22.01.2019




No comments:

Post a Comment