

नवी दिल्ली, 5 : भारतीय रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणा-या 90 वर्ष जुन्या पुणे-मुंबई शहरांदरम्यान धावणा-या प्रसिध्द
‘डेक्कन क्विन’ रेल्वेगाडीचे रूप आता बदलणार आहे. या गाडीला जर्मनतंत्रज्ञानाधारीत
डबे आणि विशेष सुरक्षा व्यवस्था तर राष्ट्रीय प्रारूप संस्थेच्या माध्यमातून (एनआयडी)आकर्षक
बाहयरूप, विशेष लोगो अशा सुधारणा करण्यात येणार आहेत.
‘डेक्कन क्विन’ या रेल्वे गाडीची सेवा अधिक प्रवासी
स्नेही करण्याच्या दृष्टीने मध्यरेल्वेने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार
रेल्वेगाडीच्या रुपासह, सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
‘डेक्कन क्विन’
मध्ये असे होणार बदल
या रेल्वे
गाडीच्या ताफ्यात आता जर्मन डिझाईनचे लिंक हॉफमन बुश (एल.एच.बी.) हे विशेष डबे येणार
आहेत. हे डबे सुरक्षेच्या आणि आरामदायी प्रवासाच्यादृष्टीने महत्वाचे आहेत. यासोबतच
एल.एच.बी डब्यांचे बाहयरूपही आकर्षक बनविण्यात येणार आहे. त्यामुळे सद्याच्या निळया-
पांढ-या व लाल रंगातील ही रेल्वे गाडी अधिक आकर्षक रूपात प्रवाशांच्या दिमतीस येणार
आहे. प्रवशांना या रेल्वेगाडी विषयी असणारा जिव्हाळा लक्षात घेता बाहयरूपाचे प्रारूप
तयार करताना विविध माध्यमांतून प्रवशांची मतं व सूचना घेण्यात आल्या आहेत. यासर्वांच्या
आधारे आणि प्रवाशांच्या पसंतीक्रमाधारे मध्यरेल्वेने तयार केलेल्या एकूण प्रारूपापैकी
योग्य त्या प्रारूपाची निवड करण्यात येईल.
वेगळी ओळख सांगणा-या डेक्कन
क्विनसाठी विशेष लोगोही तयार करण्यात येणार आहे. जागतिक वारसा लाभलेल्या मुंबईच्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर हा लोगो तयार करण्यात येत असून मध्यरेल्वेने
तयार केलेल्या 8 वेग-वेगळया रेल्वे डब्यांच्या बाहयस्वरूपाचे प्रारूप आणि लोगो रेल्वे
बोर्डाच्या निर्देशानुसार अहमदाबाद येथील राष्ट्रीय प्रारूप (डिझाइन) संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. या संस्थेच्या पथकाने डेक्क्न क्विनला
भेट दिली व प्रवाशांच्या भावनाही जाणून घेतल्या. एनआयडीचे हे पथक या महिन्यातच आपला
अहवाल सोपवणार आहे.
वर्ष 1930 पासून प्रवशांच्या
सेवेत रूजू झालेल्या डेक्कन क्विनच्या नावे महत्वपूर्ण विक्रम आहेत. यात देशातील पहिली
सुपर फास्ट ट्रेन होण्याचा बहुमान, पहिली लांब पल्ल्याची इलेक्ट्रीक ट्रेन, महिलासांठी
स्वतंत्र डबा असणारी देशातील पहिली ट्रेन आणि डायनींग कार प्रमाणे आसनव्यवस्था असणारी
देशातील पहिली ट्रेन होण्याचा बहुमानही या रेल्वे गाडीने मिळविला आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला
फॉलो करा :
000000
रितेश भुयार /वृत्त
वि. क्र.50/ दिनांक 5.03.2020


No comments:
Post a Comment