Saturday, 16 May 2020

देशाच्या राजधानीतून 1000 विद्यार्थी स्वगृही महाराष्ट्राकडे रवाना महाराष्ट्र शासनाने राबविली देशातील सर्वात मोठी मोहीम

 




 


नवी दिल्ली, 16 : केंद्रीय लोकसेवा आयोग(युपीएससी) परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या व कोराना संकटामुळे दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना घेवून विशेष रेल्वे आज रात्री 10 वाजता येथील पुरानी दिल्ली रेल्वे स्थानाकाहून पुण्याकडे रवाना झाली.  
महाराष्ट्र शासनाच्यापुढाकाराने मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची देशातील ही पहिलीच मोहीम असू शकते.
          युपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी दरवर्षी मोठया प्रमाणात महाराष्ट्राच्या विविध भागांतून दिल्लीत मोठया प्रमाणात विद्यार्थी येत असतात. येथील राजेंद्रनगर, करोलबाग, पटेलनगर, मुखर्जीनगर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ  या भागात युपीएससीचे क्लासेस करून हे विद्यार्थी वास्तव्यास असतात. सध्या देशात व विशेषत: दिल्लीत कोरोनाच्या संकटामुळे स्थिती बिकट झाली आहे. संपूर्ण दिल्ली रेड झोन मध्ये असून लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवस्थाच बंद असल्याने या विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशात कोरोना संसर्गाची भितीही आहे. यामुळे युपीएससी परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला व त्यांनी येथील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्तांची भेट घेतली. महाराष्ट्र सदनाने यापुढे राज्य शासनाकडे या संदर्भातील प्रस्ताव पाठवला व मुख्यमंत्री कार्यालयाकडून यात वेगवान हालचाली सुरु झाल्या.
          या विद्यार्थ्यांना  महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य शासनाकडून रेल्वे मंत्रालयाकडे विशेष रेल्वेची मागणी करण्यात आली ती मागणी मान्य झाली . पुढे दिल्ली शासनानेही महाराष्ट्र शासनाच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला व 16 मे रोजी या विद्यार्थ्यांना विशेष रेल्वेने घेवून जाण्याचा निर्णय झाला.
          महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय आणि सहायक निवासी आयुक्त तथा नोडल अधिकारी अजितसिंह नेगी यांनी यासाठी योजना आखली. योजनेनुसार दिल्लीच्या वेगवेगळया भागात अडकलेल्या या विद्यार्थ्यांना एकूण 10 केंद्रावर एकत्र आणण्यात आले. त्यासाठी सदनाने विशेष बसेसची व्यवस्था केली. त्या-त्या केंद्रावर वर या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली तसे प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले. वैद्यकीय चाचणीनंतर महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक यांनी या विद्यार्थ्यांना पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोचविले.
          या सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनन, भारतीय रेल्वे आणि दिल्ली सरकारचे आभार मानले व कोरोना संकट आटोपल्यावर पुन्हा येण्याच्या संकल्पासह दिल्लीला निरोप दिला. यावेळी उपस्थित महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी कर्मचा-यांनी भावपूर्ण निरोप दिला.
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic
                                                            00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.62 /दि.16.05.2020



No comments:

Post a Comment