Tuesday 3 November 2020

नदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला





               अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्याला राष्ट्रीय जल पुरस्कार

 

नवी दिल्ली, 3 :  सांगली जिल्हयातील अग्रणी नदिच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर  दखल  घेण्यात आली असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्हयाची निवड झाली आहे. पुढील आठवडयात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

            केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2019 चे 'राष्ट्रीय जल पुरस्कार' घोषित झाले आहेत. विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार जाहीर झाले आहेत. नदी पुनरूज्जीवन श्रेणी मध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्हयांना पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्हयाला अग्रणी नदिच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.पश्चिम विभागात चार राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश आहे.    

 

                  अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

 

सांगली जिल्हयाच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम असलेली अग्रणी नदी दिडशे वर्षांपूर्वी वाहती होती. मात्र,मध्यंतरीच्या काही दशकांत ही नदी कोरडी होती व या नदिचे काही क्षेत्र लुप्त झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्हयातील टंचाईग्रस्त भागात पाणी साठे निर्माण करण्याच्या कार्यांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले. जिल्हा प्रशासनाने खानापूर , तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातील 55 कि.मी. लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याच्या ध्यासाने  कार्य केले.

राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागने वर्षानुवर्षे कोरडया पडलेल्या नदिला पुनरुज्जीवन मिळाले. नदिच्या उगमापासून खोलीकरण आणि रूंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले.

हे पात्र खानापूर तालुक्यामध्ये 22 कि.मी. इतके आहे. उगमापासून तामखडी, जाधववाडी, गोरेवाडी, बेणापूर, बलवडी, करंजे, सुलतानगादे आदी गावांतील स्थानिकांनी  या कार्यात सक्रीय श्रमदान दिले. त्यामुळे जवळपास 2 कोटी मूल्य असणारी ही कामे अवघ्या 65 लाख रुपयांमध्ये पूर्णत्वास आली.
या कामांतर्गत नदीपात्रातील 3 लाख, 70 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला . त्यामुळे नदीचे पात्र 50 फूट रुंद 6 फूट खोल करण्यात प्रशासनाला यश आले . या नदीपात्रात ठिकठिकाणी 50 ते 60  नालाबांध घालण्यात आले . त्यामुळे साठणाऱ्या पाण्याचा लाभ परिसरातील जनतेला झाला आहे.अग्रणी नदी बारमाही झाल्याने नदीकाठच्या 21 गावांना  लाभ झाला. तसेच अग्रणी खोरे बारमाही होऊन या खोऱ्यातील 105 गावात जलक्रांती  घडून आली.

हा पुरस्कार म्हणजे अग्रणी  नदी खो-यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान -

                                                                          आयुक्त शेखर गायकवाड

राष्ट्रीय जल पुरस्कार हा अग्रणी नदी खो-यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांचा सन्मान असल्याच्या भावना सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्याचे  विद्यमान साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना व्यक्त केल्या .

अग्रणी नदीच्या एकूण 55 कि.मी.च्या पुनरुज्जीवनाचे कार्य केवळ दीड वर्षात पूर्ण करण्यात आले व नवीन 34 बंधारे बांधले. विशेष म्हणजे यात उगमापासून लुप्त झालेल्या 22 कि.मी. नदी पात्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले. दिडशे वर्षांनतर अग्रणी पुन्हा प्रवाहीत झाली व सुमारे 28 हजार शेतक-यांच्या जीवनामध्ये यामुळे आनंद निर्माण झाल्याचे श्री गायकवाड यांनी सांगितले. या कार्याची प्रेरणा घेवून कर्नाटकातील तीन गावांनी  लोकवर्गणीतून हे कार्य पुढे चालविले आहे ही बाबही त्यांनी यावेळी अधोरेखीत केली.

 

         

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा htpp://twitter.com/MahaGovtMic                                                         

                                     ०००००

रितेश भुयार / वि.वृ.क्र.100/ दि.3.11.2020

 

 

No comments:

Post a Comment