Tuesday, 12 January 2021

पुण्याच्या अयाती शर्माचा ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात’ देशात द्वितीय क्रमांक




 


                        लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते सन्मान

 

नवी दिल्ली ,१२  : राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात पुणे येथील गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटीक्स अँड इकोनॉमिक्सची विद्यार्थीनी अयाती शर्मा ने बाजी मारत देशात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या हस्ते आज अयाती यांना ‘राष्ट्रीय युवा संसद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

 

            केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने संसद भवनाच्या सेंट्रल हॉल मध्ये आज दुस-या ‘ राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या-२०२१ समारोप कार्यक्रमात पहिल्या तीन विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या प्रमुख उपस्थितीत व लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल-निशंक, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू  यावेळी उपस्थित होते.

 

या महोत्सवात सहभागी झालेल्या युवकांपैकी अंतीम फेरित देशातील २९ युवकांमधून सर्वोत्तम तीन पुरस्कार विजेत्यांमध्ये दोन मुली आणि एक मुलगा असून पुण्याच्या अयाती शर्मा ला द्वितीय  क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २ लाख रुपये , सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लखनऊ (उत्तर प्रदेश) ची मुदिता मिश्रा प्रथम तर  कांचनगंगा (सिक्कीम)चा अविना मंगत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.  

 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाची संकल्पना साकारली असून पहिल्या महोत्सवात नागपूर येथील श्वेता उमरे या विद्यार्थीनीने पहिल्या क्रमांकाचा ‘राष्ट्रीय युवा संसद पुरस्कार’ पटकाविला होता.

 

             संसद भवनात सोमवारी (११ जानेवारी २०२१) आयोजित अंतिम स्पर्धेत ‘व्होकल फॉर लोकल’ या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत देशभरातील विविध  राज्यांतून निवड झालेल्या २९ प्रतिनिधींचा सहभाग होता. याच स्पर्धेत अयाती  शर्मा ने देशात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे व लोकसभाअध्यक्षांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.       

 

महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात अयाती शर्मासह विजेत्या स्पर्धकांची भाषणेही झाली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी  श्री. ओम बिरला, डॉ. रमेश पोखरियाल-निशंक, श्री.किरेन रिजीजू  यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

रितेश भुयार/वि.वृ.क्र./दि.१२.०१.२०२१

 


No comments:

Post a Comment