Wednesday, 10 February 2021

कुसुमाग्रजांच्या कविता वाचन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन


 

नवी दिल्ली, 10:  मराठी भाषा गौरव दिनया  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी  वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंती  दिनाच्यानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन साहित्य रसिकांना करण्यात येत आहे.

 

            राजधानी दिल्लीतून राज्य शासनाच्या प्रसिध्दी विषयक कामांसह मराठी भाषा व महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख दर्शविणारे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राची खास ओळख आहे. वि.वा.शिरवाडकरांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत परिचय केंद्राने त्यांच्या कविता वाचन उपक्रमाचे आयोजन केले आहे. मराठी भाषा अवगत असणा-या सर्व नागरिकांनी  या उपक्रमात सहभागी होवून कुसुमाग्रजांच्या कविता पुन्हा जनतेपर्यंत पोहचावे या उद्देशाने परिचय केंद्राने  हा उपक्रम आखला आहे. उत्तम सादरीकरणास परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांद्वारे प्रसिध्दी देण्यात येणार आहे.

                                                    मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज

 विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्‍कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान  आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. कुसुमाग्रजया टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे मराठी साहित्यिक. कुसुमाग्रजांच्या स्मृतिला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून  साजरा करण्यात येतो.

वि.वा शिरवाडकरांचे  एकूण २४ कविता संग्रह , ३ कादंब-या, १६ कथा संग्रह, १९ नाटके, ५ नाटिका व एकांकी आणि ४ लेखसंग्रह आदी साहित्य प्रसिध्द आहे. १९६४ मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये त्यांच्या नटसम्राट  ह्या नाटकाला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले तर याच कलाकृतीला १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारही  मिळाला.

                       या कविता संग्रहातील कविता वाचनाचे आवाहन

            कुसुमाग्रजांचे एकूण २४ कविता संग्रह प्रकाशित आहेत. यामध्ये जीवनलहरी , विशाखा , समिधा , किनारा, मेघदूत अनुवाद, मराठी माती, स्वगत ,जाईचा कुंज बालांसाठी कविता, हिमरेषा , वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, श्रावण, प्रवासी पक्षी, पाथेय, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज, माधवी, महावृक्ष, करार एका ता-याशी, चाफा, मारवा, अक्षरबाग, थांब सहेली या काव्यसंग्रहांचा समावेश आहे.  

         कुसुमाग्रजांच्या  या २४ काव्य संग्रहातील निवडक कविता  व्हिडीओ  स्वरूपात  या कार्यालयास पाठवावे. सुस्पष्टोच्चार व उत्तम सादरीकरण असणा-या कविता वाचनाची कार्यालयाच्या संपादन मंडळाकडून निवड झाल्यावर आमच्या ट्विटर, फेसबुक, युटयूब, इंस्टाग्राम आदीं द्वारे  प्रसिध्दी देण्यात येईल.

कविता वाचना-या व्यक्तीने स्वत:चा अल्प परिचय,  कुसुमाग्रजांची जी कविता वाचनार आहात त्या  कवितेचे शिर्षक व कविता संग्रहाचे नाव याची थोडक्यात माहिती दयावी. कार्यालयाच्यावतीने दिनांक १४ ते २७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचे व्हिडीओ प्रसारीत करण्यात येणार आहेत. व्हिडीओ निवडीचे संपूर्ण अधिकार कार्यालयाच्या संपादन मंडळाकडे असतील. तेव्हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचे व्हिडीओ तयार करून आम्हाला पाठवा. ९८९९११४११३० आणि ९८७१७४२७६७ या  व्हाट्सअप क्रमांकांवर रचना पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.        

                                             

           

                     आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

                                                                        00000

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र. 24  /  दिनांक  10.02.2021

No comments:

Post a Comment