नवी दिल्ली, 16 :
बालपणीच टिव्ही
कार्टून, मोबाईल गेममध्ये रमणा-या पिढीची प्रतिनिधी तरीही यास अपवाद असलेली गडचिरोली
जिल्हयाची विनंती झाडे साहित्यात रमणारी आहे. वयाच्या साडेतीन वर्षातच तिने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता तोंडपाठ करून परिचय केंद्राच्या कविता वाचन उपक्रमात सहभाग नोंदवला.
या उपक्रमात सहभागी होणारी ती सर्वात कमी वयाची साहित्य रसिक ठरली आहे.
‘मराठी भाषा गौरव दिन’ या
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंती दिनाच्यानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने
कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात राज्यातून व
राज्याबाहेरूनही साहित्य रसिक सहभागी होत आहेत. या उपक्रमातील वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे गडचिरोली जिल्हयातील
कुरखेड येथील विनंती झाडे या चिमुकलीचा सहभाग. बोबडे बोल असले तरी विनंतीने मात्र
उत्तम लयीत ‘कणा’ ही कविता सादर करून या
उपक्रमातील सर्वात लहान सहभागकर्तीचा मान मिळविला आहे.
चिमुकली विनंती दोन वर्षाची असल्यापासूनच
बोलायला लागली व बडबडगीते, पाठयपुस्तकातील कविता ती आई वंदना झाडे यांच्या मागावून
म्हणू लागली. ब-याच रचना तिच्या पाठही झाल्या. तिची आई वंदना यांना आवडणारी कुसुमाग्रजांची
‘कणा’ ही कविता त्यांनी आपल्या मुलीलाही शिकवली व चिमुकल्या विनंतीने ही कविता तोंडपाठच केली. विनंतीचे वडील तुळशीदास झाडे यांना
प्राध्यापक मित्राकडून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या
कविता वाचन उपक्रमाची माहिती समजली व त्यांनी आपल्या मुलीला या उपक्रमात सहभागी
करण्याचे ठरविले. कुरखेडच्या गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या प्रांगणातील
लॉनवर विनंती व तिच्या आई-वडिलांनी मोर्चा वळवला व तिचा ‘कणा’ कविता सादरीकरणाचा व्हिडीयो तयार करून घेतला. परिचय केंद्राला हा
व्हिडीयो पाठवला व संपादक मंडळाने या व्हिडीयोची निवड केली आणि हे सादरीकरण
उपक्रमातही सहभागी करून घेतले.
विनंतीच्या आईने मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले
असून त्या गृहिणी आहेत. तिचे वडील कुरखेड येथील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात प्राध्यापक
म्हणून कार्यरत आहेत. कोरोना महामारीमुळे अंगणवाडीत जाता येत नसल्याने विनंती हिरमुसली आहे तर मोठी झाल्यावर शिक्षिका
व्हायचे तिचे स्वप्न आहे.
आम्हाला ट्विटर
वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
रितेश भुयार /वृत्त
वि. क्र. 27 / दिनांक
16.02.2021
No comments:
Post a Comment