Wednesday, 24 February 2021

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान






   
          

नवी दिल्ली,दि.24 :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषी व कृषी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते आज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुणे आणि अहमदनगर जिल्हयांनाही प्रथम क्रमाकांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने केंद्रीय कृषी व कृषी कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील पुसा कॉम्प्लेक्स परिसरातील ए.पी.शिंदे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या योजने अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे राज्य व निवडक जिल्ह्यांना केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्राला एकूण तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय कृषी व कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी , केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल, महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासह उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश , अरूणाचल प्रदेश या राज्यांचे कृषी मंत्री यावेळी उपस्थित होते.

 

                    राज्याच्या कृषी विभागाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धिरज कुमार  यावेळी उपस्थित होते.

 

यायोजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी ५ टक्के लाभार्थींची  तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यात ४,६८,७४७ शेतकऱ्यांची जिल्हा, तालुका व गाव निहाय यादी प्राप्त झाली होती. त्यातील  ९९.५४ टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून राज्याने देशात उत्कृष्ट कार्य केले.तसेच राज्यात या योजनेसंदर्भातजवळपास ३८९९१ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी २३६३२ तक्रारींचानिपटारा करण्यात आला. या दोन्ही उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून महाराष्ट्राला या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

                          पुणे आणि अहमदनगर जिल्हयांचाही सन्मान

या योजनेंतर्गत तक्रार निवारणात उत्कृष्ट कार्य करत देशातील उत्कृष्ट जिल्हा ठरलेल्या पुणे  जिल्हयाला यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे  यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेंतर्गत पुणे जिल्ह्याने प्राप्त २२७८  तक्रारींपैकी २०६२  तक्रारींचा निपटारा करून देशात प्रथम क्रमांक पटकाविला .

या योजनेंतर्गत लाभार्थी भौतिक तपासणीच्या कामात देशात सर्वोत्कृष्ट जिल्हयाचा मान पटकाविणा-या अहमदनगरजिल्हयाला यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणी अंतर्गत २८८०२ लाभार्थी पैकी सर्वच अर्थात १०० टक्के तपासणी पूर्ण करून देशात उल्लेखनीय कार्य केले आहे.

 

महाराष्ट्रात आतापर्यंत १.१४ कोटी शेतकऱ्यांनीप्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेत नोंदणी केली असून आतापर्यंत साधारण १.०५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ११६३३ कोटी रुपये जमा झाले आहेत.

 

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटरहॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi

                                                              000000 


 

No comments:

Post a Comment