नवी दिल्ली, १३ : प्रसिध्द लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आणि मग एक दिवस’ या अनुवादित पुस्तकासाठी आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
साहित्य अकादमीच्यावतीने येथील कोपर्निकस मार्गस्थित कमानी सभागृहात आयोजित ‘साहित्योत्सवा’च्या दुस-या दिवशी वर्ष २०१९ च्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्काराचे अकादमीचे अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी हिंदी भाषेतील प्रख्यात कथा लेखिका चित्रा मुद्गल उपस्थित होत्या. या समारंभात एकूण १९ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती व अनुवादकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रसिध्द अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या ‘अँड देन वन डे’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद असलेले ‘आणि मग एक दिवस’ या पुस्तकाच्या लेखिका सई परांजपे यांना प्रा. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते या समारंभात मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० हजार रूपये , ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सई परांजपे यांनी ‘आणि मग एक दिवस’ या पुस्तकाचा ओघवता व रसाळ अनुवाद केला त्यामुळेच हे कथन प्रामाणिक व परखड झाले आहे. छोटया छायाचित्रांच्या बारा पृष्ठांच्या दृष्यभागाने या पुस्तकाच्या आशयात जीवंतपणा आला आहे. हे पुस्तक रंजक आणि नाटयपूर्ण आणि साहित्यिक अंगानेही उत्तम ठरल्याने या पुस्तकाने मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादीत पुस्तकाचा मान मिळविला आहे. आज या लाकृतीला व लेखिकेला मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र. 42/दि.13.03.2021
No comments:
Post a Comment