डॉ. विजय चोरमारे गुंफणार पहिले पुष्प
नवी दिल्ली, दि. १७ : थोर योध्दयांची ,संतांची व समाजसुधारकांची परंपरा असणा-या व विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणा-या महाराष्ट्र राज्य निर्मितीचे पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष हा सुवर्णयोग साधत परिचय केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव ऑनलाईन व्याख्यानमालेची’ १९ मार्च २०२१ रोजी सुरुवात होत आहे. कवी, लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमोरे हे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत.
‘गेल्या ६० वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण व राजकारण’ या विषयावरील व्याख्यानाने डॉ. वियज चेारमारे हे १९ मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजता पहिले पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ६० वर्षांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा व उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्याच्या उद्देशाने १९ मार्च ते १ मे २०२१ दरम्यान ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यान मालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होवून महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रगतीबाबत आपले विचार मांडणार आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राचाही हीरक महोत्सव
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये १९६१ मध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करण्यात आली. राजधानीत महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूतावास म्हणून हे कार्यालय ओळखले जाते . केंद्र व राज्य शासनातील दुवा म्हणून या कार्यालयाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या कार्यालयाने गेल्या ६० वर्षात यशस्वी वाटचाल केली आहे. राज्याचे व परिचय केंद्राचे स्थापना वर्षे असे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. विजय चोरमारे यांच्या विषयी
डॉ. चोरमारे हे गेल्या ३३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दै.सकाळ (कोल्हापूर), दै. लोकमत ( कोल्हापूर आणि मुंबई) आणि दै.प्रहार (मुंबई), दै.महाराष्ट्र टाइम्स (कोल्हापूर आणि मुंबई) या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. कोल्हापूर येथे सुरु झालेल्या दै.महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक म्हणून त्यांनी प्रारंभापासून जबाबदारी सांभाळली. 'बाबूराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटांच्या विकासातील योगदान' या विषयावरील संशोधनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्यांना पीएचडी प्रदान केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारस्कारासह विविध पुरस्कार व फेलोशिफ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात आणि आतबाहेर सर्वत्र आदी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिध्द झाले आहेत. देवाशपथ खरं लिहीन आणि मुजरा या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लिखाण केले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे संपादन व अनुवाद केले आहे.
दुपारी 12 वाजता समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण होणार
शुक्रवार 19 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share वरून तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi या युटयुब चॅनेल वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४७/दिनांक १७.०३.२०२१
No comments:
Post a Comment