Monday, 22 March 2021

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा - खासदार कुमार केतकर


 

नवी दिल्ली, दि. २१ : रंगभूमी, साहित्य, चित्रपट,क्रीडा,सामाजिक व राजकीय घडामोडींचे केंद्र असलेली महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाच्या सांस्कृतिक एकजुटीचा वारसा असल्याचे  प्रतिपादन,ज्येष्ठ पत्रकार तथा विद्यमान खासदार कुमार केतकर यांनी आज केले .

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना महाराष्ट्राचा मुंबई वारसा या विषयावर श्री. केतकर बोलत होते.  

         मुंबईचे व्यक्तीमत्व प्रामुख्याने गिरणगाव आणि यातील रंगभूमीने नटलेले होते. महाराष्ट्राची  निर्मिती मुंबईसह व्हावी यासाठी १० ते १५ वर्षे प्रखर चळवळ झाली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही शाहीर अमर शेख,अण्णाभाऊ साठे, गवाणकर यांच्या शाहिरीने नटलेली असल्याने त्याचेही संस्कार मुंबईतील गिरणगावावर होते, असे श्री केतकर म्हणाले. पुढे महाराष्ट्राची निर्मिती होवून मुंबई ही राज्याची राजधानी झाली आणि  मुंबईचे  चित्र झपाटयाने बदलत गेले.  

गिरणगाव, गिरगाव, शिवाजी पार्क, पार्ला असे निरनिराळे सांस्कृतिक बेट मुंबईत तयार झाली होती. मुंबई ही सर्व भाषा, सर्व संस्कृती अशी सर्व समावेशक आहे. मुंबईचा वारसा हा मूलभूम मुल्यांवर आधारीत असल्यामुळे तो कायम टिकणारा असल्याचेही श्री केतकर यांनी सांगितले.   

                                            मुंबई व कामगार चळवळ

मराठी भाषेचा मोठा प्रभाव मुंबईच्या वातावरणावर होता. गिरण्यांच्या संबंधीत व्यवसायात लोक कामाला आले व मुंबईचे झाले. मुंबईच्या कामगार चळवळीचा संस्कार संबंध महाराष्ट्रावर होता. कॉम्रेड श्रीपाद डांगे, एस.एम.जोशी, दत्ता देशमुख ,प्रबोधनकार ठाकरे यांचा प्रभाव सबंध महाराष्ट्रभर असे. हा प्रभाव आणि मुंबईचे वैशिष्टे महाराष्ट्रभर पसरविण्याचे कार्य आचार्य अत्रे यांच्या मराठा  दैनिकासह अन्य दैनिकांनी प्रभावीपणे केले.  

                                          मुंबईने जपली राष्ट्रीय एकात्मता

राष्ट्रीय एकात्मता जपण्यामध्ये महत्वाचे साधने असणा-या चित्रपट आणि क्रिकेट यांनी सबंध देशााला एकत्व प्राप्त करून दिले.भारतातील चित्रपटाचे केंद्र असलेल्या मुंबईतील हिंदी चित्रपट सृष्टीमुळे जनसामान्यांमध्ये भारलेले वातावरण असायचे. आजही मुंबईच्या चित्रपट सृष्टीचा भारतावर सांस्कृतिक प्रभाव कायम आहे. मुंबईने देशाला  क्रिकेटचा वारसा  देत सुनिल गावस्कर, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर, दीलीप वेंसरकर आदी जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू  दिले असल्याचे श्री. केतकर म्हणाले.  

 

देशाच्या अर्थकारणाचे केंद्र मुंबई

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील दलाल स्ट्रीटचा आर्थिक प्रभाव हा उदारमतवादी आर्थिक धोरणाच्या आधी भांडवली अर्थव्यवस्थेवर पडत असे.  मुंबईतूनच कामगार आणि भांडवलदार अशा दोन्ही प्रवाहाचा प्रभाव देशभर होत असे. पुढे १९७० नंतर ठाणे ,विक्रोळी, भांडूप, बेलापूर परिसरात कारखाने आले व या शहाराला आर्थिक गती मिळाली. मुंबई बदलत गेली. संगणकाचे वर्चस्व वाढू लागले .येथील तरूणवर्ग आयआयटी कडे वळला. १९९० नंतर देशातील तरूण मोठया प्रमाणात परदेशात गेले आणि यात मुंबई आयआयटीतील ७० ते ८० टक्के तरूण होते.  

                               मुंबईने दिला सामाजिक एकत्वाचा वारसा  

मुंबईच्या जीवनात सामाजिक एकत्व निर्माण करण्याची ताकद आहे. ही ताकद देशभर पसरत गेली आणि यामुळे देशाचे एकत्व सिध्द होत गेले. कामगार चळवळीचा श्रीगणेशा मुंबईतूनच झाला. देशातील स्वातंत्र्य चळवळीचे सर्व महत्वाचे ठराव मुंबईतूनच झाले. इथेच कम्युनिस्ट चळवळ, समाजवादी चळवळ, शेतकरी कामगार चळवळी आदि चळवळी वाढल्या. मानवी हक्क, वेतन हक्क, कामारांच्या हक्कांचे केंद्रही मुंबईच आहे. हे सबंध मुंबईचे वैशिष्टे सर्वांना भारावून टाकणारे असल्याचे श्री केतकर यांनी प्रतिपादीत केले. 

            .                                       000000 

‍िरितेश भुयार -अंजु निमसरकर /वृत्त वि. क्र.५३ /दिनांक २१.०३.२०२१

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment