Friday, 16 April 2021

दिल्लीत महाराष्ट्राची उंच पताका- ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक


 

नवी दिल्ली,१६ : महाराष्ट्र स्नेहसंवर्धक समाज ही शंभर वर्ष जुनी संस्था,मराठी शाळा, मराठी मंडळे आणि विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या मराठी माणसांनी महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व वैचारीक वारसा जपत दिल्लीतील महाराष्ट्राची पताका उंचाविली असल्याचे, मत ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक  विजय नाईक यांनी आज व्यक्त केले.   

         महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ‍‍दिल्लीतील महाराष्ट्र  या विषयावर २८वे पुष्पगुंफताना श्री. नाईक बोलत होते.

              महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज, बाडा हिंदुराव रुग्णालय,तालकटोरा उद्यान,नोएडा गोल्फ कोर्स येथील स्तंभ आदी वास्तू तसेच शिवाजी स्टेडियम, खाशाबा जाधव स्टेडियम, शिवाजी ब्रिज, तिलक ब्रिज, बाजीराव पेशवे रोड, न्या.सुनंदा भंडारे रोड अशा महाराष्ट्राच्या ठसठसीत खुणा आज देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये बघायला मिळतात. केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाचे पद भुषवून प्रदीर्घ काळ दिल्लीत वास्तव्यास असलेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीतील महाराष्ट्राला आकार दिला तर दिल्लीत मराठी माणसांसाठी सदैव मदतीस तत्पर असणारे काकासाहेब गाडगीळ हे मराठी जणांचे आधारवडच ठरले. दिल्लीच्या वेगवेगळया भागातील मराठी संस्था. मंडळे व वेगवगेळया क्षेत्रात कार्यरत मराठी माणसांनी महाराष्ट्राची वेगळी छाप दिल्लीत सोडली असून राज्याची पताका अभिमानाने उंचाविली असल्याचे श्री नाईक म्हणाले.   

            जन्मभूमी अहमदनगर असलेले व गेल्या ५२ वर्षांपासून दिल्लीवासी  झालेले आणि सक्रीय पत्रिकारीतेत ४५ वर्ष कार्यरत श्री नाईक यांनी यावेळी दिल्लीतील महाराष्ट्राच्या वेगवेगळया पाऊल खुणांबाबत माहिती दिली. २०व्या शतकाच्या प्रारंभी दिल्लीत मराठी माणसांची पहिली वसाहत नया बाजार भागात झाली. मराठी लोकांनी एकत्र येत नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पासून अवघ्या २ कि.मी. अंतरावरील पहाडगंज भागात १९१९ मध्ये महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज ही संस्था स्थापन केली.संस्थेच्या माध्यमातून मराठी सण,उत्सव साजरे करण्यात येऊ लागले. पुढे दिल्लीत मराठी माणसाला हक्काची व अल्पदरात राहण्याची व्यवस्थाही संस्थेने बृह्नमहाराष्ट्र भवनच्या रुपाने केली, नुतन मराठी शाळाही पहाडगंज भागातच उभारली. पुढे खारी बावली, चांदणी चौक भागात मराठी लोकांचा विस्तार झाला आजही या भागात मराठा सेनानी गंगाधर यांनी बांधलेले शिवपार्वती मंदीर असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.

मराठी महिलांच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यकलापासाठी १९५३ मध्ये लोधी कॉलनी परिसरात वनिता समाजाची स्थापना झाली. दिल्ली  राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात अंदाजे ३ लाख मराठी लोकसंख्या असून वेगवेगळया भागात जवळपास ४५ मराठी मित्रमंडळ कार्यरत आहेत. नुतन मराठी शाळा, चौगुले पब्लिक स्कुल या मराठी शाळा दिल्लीत कार्यरत आहेत. दिल्लीत कार्यरत मराठी अधिका-यांनी स्थापन केलेली पुढचे पाऊल संस्था व दिल्लीत दिवाळी पहाटचा अनोखा उपक्रम राबविणा-या दिल्ली मराठी प्रतिष्ठान या अलीकडच्या संस्थांही दिल्लीत महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करीत असल्याचे श्री नाईक म्हणाले.

                     दिल्लीत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पाऊल खुणा

 स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार करता‍ ‍दिल्लीतील महाराष्ट्राच्या महत्वाच्या तीन पाऊल खुणा सापडतात, असे श्री नाईक म्हणाले. १७३७-३८ मध्ये बाजीराव पेशवे यांनी मोघल सुलतान सादत खान याला पराभूत केले तेव्हा पेशव्यांच्या सैन्यांच्या येथील मुक्कामात त्यांना थाळी व कटोरीतून जेवन दिले जात असे म्हणून येथील उद्यानाला तालकटोरा उद्यानअसे नाव पडले.

ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यातील महाराजा दौलतराव यांचे जावई मराठा उमराव राजा हिंदुराव यांनी १८५७ च्या उठावानंतर जुन्या दिल्लीत मुक्काम ठोकला. १९५८ मध्ये त्यांच्या महालाचे रुपांतर बाडा हिंदुराव रुग्णालयात करण्यात आले. 

नोएडा येथील गोल्फ कोर्समध्ये १९१६ साली उभारण्यात आलेला स्तंभ आजही मराठा सैन्याच्या शौर्याची गाथा सांगत आहे. ४० फुट उंचिच्या या स्तंभावर २१८ वर्षांआधी मराठा सैन्यांनी या परिसरात गाजविलेल्या  शौर्याचा उल्लेख आढळतो.    

                           दिल्लीतील  महाराष्ट्राची जडणघडण

            भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पहिले विधी मंत्री  झाले व त्यांच्या रुपाने दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकीय अस्तित्वाला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९६२ मध्ये देशाचे संरक्षण मंत्री झाले. पुढे १९८४ पर्यंत केंद्र सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत असताना त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यात दिल्लीतील महाराष्ट्राची जडणघडण झाल्याचे श्री नाईक म्हणाले.महाराष्ट्राचे उत्तुंग नेते म्हणून त्यांची दिल्लीत ओळख होतीच याबरोबरच साहित्याचे उपासक, कलाकारांना वाव देणारे त्यांचे व्यक्तीमत्व होते. दिल्लीत भरलेल्या ४३ व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलाचे अध्यक्षपद श्री चव्हाण यांनी भूषविले होते. यानंतर दिल्लीत अनेक मराठी नाटके ,गीत-संगीत व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली. दिल्लीत महाराष्ट्र घडविणा-या मान्यवरांमध्ये मराठी माणसांना सहकार्यासाठी सदैव तत्पर असणारे काकासाहेब गाडगीळ, महाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे मानद अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री वसंतराव साठे,मुरलीधर भंडारे,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदींसह दिल्लीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात भर घालणारे महाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले रा.मो. हेजीब, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव व राजदूत द्वय सुधीर देवरे आणि डॉ ज्ञानेश्वर मुळे आदी मंडळींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

 यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या महाराष्ट्र परिचय केंद्रानेही दिल्लीतील महाराष्ट्राला बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगून परिचय केंद्राच्या आजवरच्या प्रमुखांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. उदरनिर्वाहासाठी दिल्लीच्या रस्त्यावर चहाची टपरी चालविणारे लक्ष्मण राव यांनी लिखणाचा व्यासंग जपला व आज ते ख्यातीप्राप्त लेखक झाले ॲमेझॉन, किंडल, फ्लीपकार्टवर त्यांची पुस्तके विकली जातात. जागतिक किर्तीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, अरबी समुद्रातील छत्रपती शिवराय, अयोध्येतील राममंदिरात रामाचा भव्य पुतळा तयार करण्याचे काम करीत असलेले जय काकतीकर यांच्यासह राजकारण,प्रशासन,पत्रकारिता आदी क्षेत्रात दिल्लीतील मराठी माणसांनी महाराष्ट्राची मान गौरवाने उंचाविली आहे.

     मराठी संस्था,मंडळे, विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी महाराष्ट्राचा समृध्द वारसा जपत राज्याची पताका दिल्लीत उंचाविली असल्याचे श्री नाईक यांनी यावेळी सांगितले.  

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा:

         http://twitter.com/micnewdelhi

                                                             ००००० 

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१०८/दिनांक १६.०४.२०२      

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment