Thursday, 8 April 2021


 

               महाराष्ट्राला बौध्दिकतेचे अधिष्ठान - ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर

नवी दिल्ली , : भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये बुध्दिनिष्ठतेचा उदय झाला.बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरु झालेल्या या बुध्दिमान लोकांच्या परंपरेने महाराष्ट्रालाबौध्दिकतेचे महत्वपूर्ण अधिष्ठान प्राप्त करून दिले, असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आज मांडले.

             महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे २१वे पुष्प गुंफतानामहाराष्ट्राचा तर्कवाद या विषयावर श्री कुबेर  बोलत होते.

भारताच्या पारंपरिक ज्ञानाचा आधुनिकतेशी संबंध जोडून आधुनिक व विज्ञानवादी विचारांची कास धरण्याचा आग्रह करणा-या महाराष्ट्रातील बुध्दिनिष्ठ विचारकांनी राज्याला व देशालाही महत्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले, असे श्री कुबेर म्हणाले.

राजाराममोहन रॉय यांचा धर्मसुधारणेचा प्रयत्न हा भारातातील सुधारणेचा पहिला अध्याय मानला जातो. पुढे या सुधारणांचा मोठा प्रवाह महाराष्ट्रात सुरु झाला व आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे प्रणेते ठरले. १२ भाषांचा त्यांचा अभ्यास होता व विविध विषयांमध्ये त्यांना गती होती. पारतंत्र्यातील भारत देशाला जांभेकरांनी बौध्दिकतेचा आधार दिला.इंग्रज भारतीयांची कशी लुट करीत आहेत हे सांगणारे जांभेकर पहिले द्रष्टे होते. त्यांनीरिव्हर्स ड्रेन हा सैध्दांतिक विचार मांडला आणि येथून महाराष्ट्राच्या बौध्दीक परंपरेला सुरुवात झाली असे श्री कुबेर म्हणाले.

           १८१६ ते १८४७ या कालावधीत पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग यांनी वेग-वेगळया पातळीवर समाजसुधारणेचे काम केले त्यांच्याच काळात प्रार्थना समाजाची निर्मिती झाली व पुढे यामाध्यमातून महाराष्ट्रात बौध्दीकतेचे मोठे कार्य उभे राहिले. भाऊ दाजी लाड यांनी  ही पंरंपरा पुढे नेली या बुध्दिवादी मंडळींनी मुंबईत प्रबोधनाचे बीज रोवले पुढे त्याचा विशाल वटवृक्ष झाल्याचे श्री  कुबेर यांनी सांगितले.

      याच कालखंडात गोपाळहरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी  प्रभाकर वर्तमानपत्रातून तेजस्वी लिखाण करून सतत विज्ञान व आधुनिकतेची कास धराण्याचा विचार मांडला. पुढे  १८२७ ते १८४० या कालखंडात महात्मा फुले हा दैदिप्यमान तारा उदयाला आला. ज्या वातावरणातून फुले आले तेथूनच सुसंगत ज्ञान मिळवून  त्यांनी व्यवस्थेला आव्हान देण्याची बौध्दिकता दाखवली.

       १८५७ हे वर्ष महाराष्ट्राच्यादृष्टीने महत्वाचे ठरले याच वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठातून तेजपुंज तारे उदयाला आले यात पंडित विष्णू परशुराम शास्त्री,रामकृष्ण गोपाळ भांडारकर, नारायण महादेव परमानंद,महादेव गोविंद रानडे,विष्णुशास्त्री चिपळूणकर,काशिनाथ त्र्यंबक तेलंग,गणेश वासुदेव जोशी, नारायण गणेश चंदावरकर, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडे केशव कर्वे यांचा समावेश आहे. या सर्वबुध्दिमान लोकांनी भारताच्या पारंपरिक ज्ञानाचा आधुनिकतेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.आधुनिक व विज्ञानवादी विचारांचा आग्रह धरून त्यांनी राज्यात सुधारणांचे पर्व राबविले.

 महाराष्ट्र हे बुध्दीगम्यतेला महत्व देणारे राज्य आहे अशी मांडणी करून श्री कुबेर म्हणाले,नितिमत्तेसाठी धर्माची गरज नाहीव धर्म ही अनावश्यक गोष्ट आहे असा आधुनिक विचार गोपाळ गणेश आगरक यांनी मांडला व त्याचा परिपोष  पुढच्या अनेक पिढींमध्ये झिरपला. माझ्या देहावर माझा अधिकारही भूमिका मांडत इंग्लडच्या राणीला या संदर्भात पत्र लिहीणा-या मुंबई येथील रक्माबाईमुळे भारतात मुलींच्या विवाहाचा कायदा बदलला गेला व संमतीवयाचे प्रकरण म्हणून इतिहासात याची नोंद झाली.

          आगरकरांचे सहकारी गोपाळकृष्ण गोखले यांनी महात्मा गांधींना घडविले हा महाराष्ट्राच्या तर्कवादाचा महत्वाचा टप्पा असल्याचे श्री कुबेर म्हणाले. महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील तर्कवादाच्या परंपरेतील शेवटचे नेते होते व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणात महादेव रानडे यांच्या प्रमाणे बुध्दीमान महाराष्ट्रात निपजला नाही व निपजणार नाही असे  गौरवोद्गार काढले होते, असे श्री कुबेर यांनी सांगितले.

           धर्माची चिकित्सा करणारे प्रबोधनकार ठाकरे, स्वदेशीची संकल्पना देशात सर्वप्रथम मांडणारे लोकमान्य टिळक, विमान उडवण्याचा प्रयत्न करणारे तळपदे , इंग्लडमधील वर्तमानपत्रांनी  भारताचा एडिसन असा  गौरव केलेले शंकर आबाजी  भिसे, विचंवाच्या विषावर संशोधन करणारे बावीस्कर, देशातील विज्ञानाच्या प्रगतीतील केंद्र बिंदू ठरलेली टाटा मूलभूत संशोधन संस्था व तिची उभारणी,  धनंजयराव गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांनी देशात पहिल्यांदा उभारलेली सहकाराही गुढी आणि  विमा या संकल्पनेचा प्रसार करणारे  अण्णा  साहेब चिरमुले  या व्यक्तीमत्वांच्या कार्यावरही श्री कुबेर यांनी यावेळी प्रकाश टाकला.

      महाराष्ट्राच्या या बुध्दीमान परंपरेचा अभ्यास व्हावा आणि ही परंपरा पुढच्या पिढीकडे देण्याचे  प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षाही श्री कुबेर यांनी व्यक्त केली.

             महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

        http://twitter.com/micnewdelhi

                                                                       ००००० 

वृत्त.वि. क्र.९२/दिनांक .०४.२०२ 

 

 

No comments:

Post a Comment