Wednesday, 1 September 2021

‘म-हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात







  

नवी दिल्ली, 1 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘म-हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती आणि पुजेच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रदर्शन व विक्री  १० सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

             महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या मुर्त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने गेल्या २९ वर्षांपासून गणेशमूर्ती व पुजेच्या साहित्याची विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात ४० गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो.अमराठी भक्तांचाही गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभाग असतो.

         महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य खरेदीसाठी लोकांची वर्दळ सुरु झाली आहे. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायजरचा अनिवार्य  वापर आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून गणेशमूर्ती व पूजेच्या साहित्याची खरेदी होत आहे. गणेशमुर्तींच्या उंचीलाही मर्यादा असून येथे प्रदर्शन व विक्रीकरिता असलेल्या मूर्तीची कमाल उंची ३ फुट आहे. दिल्लीस्थित नंदा एस्कोर्टसह अन्य गणेश मंडळांनी  गणरायाच्या मोठया मुर्त्या राखीव करून ठेवल्या आहेत.

          ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील २३ वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील ‘म-हाटी’एम्पोरियमध्ये येतात. एम्पोरियमच्या दालनात यंदा लहान मोठया आकाराच्या एकूण ८00 गणेशमूर्ती आहेत. यासर्वच मुर्त्या इकोफ्रेंडली आहेत. 6 इंच ते ३ फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध असून ५00 रूपयांपासून ते २6 हजार रूपयांपर्यंत त्यांची  किंमत आहे.  

महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गवरिल ‘म-हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात १०   सप्टेंबर २०२१ पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहिती करिता महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

http://twitter.com/micnewdelhi 

                                                                 00000000

रितेश भुयार/वि.वृ.क्र १९२ / दि. ०१.०९.२०२१

 


 

No comments:

Post a Comment