Wednesday, 27 October 2021

नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी

 


                         २ हजार ११७ कोटींच्या कामांना होणार सुरुवात

 नवी दिल्ली , २७ : नागपूर येथील नागनदीच्या पुनरुज्जीवन  प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आज कॅबिनेटच्या खर्च व  वित्त समितीने (ईएफसी) मंजुरी दिली आहे, याद्वारे प्रकल्पाच्या २ हजार ११७ कोटींच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

            नागनदी  पुनरुज्जीवन  प्रकल्पाच्या पूर्णत्वास आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून याअंतर्गत ९२ एमएलडी  क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प,५०० किमी सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन कम्युनिटी टॅायलेट निर्माण केले जाणार आहेत.

               नागपूर शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या नागनदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी  योजना  मंजूर केली आहे. नागनदीच्या प्रवाह क्षेत्रातील भूजलपातळी वाढवण्यात आल्यास नदी पुनरुज्जीवित होईल,असा निष्कर्ष नागपुरातील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने केलेल्या संशोधनात काढण्यात आला होता .

         नागनदी आधी शुद्ध पाण्याने प्रवाहित होती. झपाट्याने झालेल्या शहरीकरणाचा परिणाम नदीच्या मूळ प्रवाहावर झाला आहे. नागपूर महापालिकेने केंद्र सरकारकडे नागनदी पुनरुज्जीवित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे केंद्र शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली होती. केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीने दिलेल्या आजच्या मंजुरीनंतर आता या प्रकल्पाच्या  प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे .

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                                   00000

वि.वृ.क्र.२२० /दि. २७.१०.2021

 

             

No comments:

Post a Comment