Friday 26 November 2021

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा










नवी दिल्ली, 26 : राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात आज आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमात भुपाळी, जात्यावरील ओवी, भारूड, गौळण, लावणी, कोळीनृत्य आदि महाराष्ट्राच्या समृध्द लोककलांचे दमदार सादरीकरण झाले. राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिकंली.

येथील प्रगती मैदानावर 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात आज अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त शामलाल गोयल यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दिन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र, महाराष्ट्र सदनाच्या गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ.निधी पांडे, अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक संध्या पवार, महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित होते.

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळव्यात दररोज सायंकाळी ‘ खुल्या सभागृहात’ व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या उपक्रमांतर्गत व्यापार मेळाव्याच्या १२ व्या दिवशी आज ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम साजरा करण्यात आला.

महाराष्ट्राच्या लोककलांचे दमदार सादरीकरण

नाशिक येथील पिनॅक इव्हेंट्स ॲड मॅनेजमेंट प्रस्तुत सप्तसुर संगीत अकॅडमीच्या कलाकारांनी ‘महाराष्ट्र लोक कला दर्शन’ कार्यक्रमाचे सादरीकरण केले. भुपाळीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पहाटे घरा-घरांमध्ये जात्यांवर दळण दळतांना गायिल्या जाणाऱ्या ओवींचे सादरीकरण झाले. मंगळागौर सणाची झलकच यावेळी रंगमंचावर बघायला मिळाली. यावेळी मंगळागौरीचे विविध गाणे गात त्यावर कलाकारांनी ठेका धरला. नारळी पोर्णिमेचा सण व कोळी बांधवांचा उत्साह दर्शविणारे कोळीगितांचे सादरीकरणही झाले. ‘मला दादला नको ग बाई …’ हे संत एकनाथांचे प्रसिध्द भारूडही यावेळी सादर झाले. लावणी ,गौळण, शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.

राज्यातील आदिवासी जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, वाघ्या-मुरळी आदींनी रसिकांच्या टाळया मिळविल्या. विविध लोककला व लोकनृत्यांच्या आविष्काराने सजलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे प्रति‍बिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.
‍ 00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार / वि.वृ.क्र. 245 /दि. 26 .11.2021


 

No comments:

Post a Comment