Thursday 30 December 2021

साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा : प्रणव सखदेव यांना मराठी भाषेसाठी पुरस्कार
























नवी दिल्ली, 30 : युवा लेखक प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’आज जाहीर झाला आहे.

देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने आज वर्ष 2021च्या युवा पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली.

प्रणव सखदेव ; मराठीतील आघाडीचे तरुण लेखक

प्रणव सखदेव हे मराठी भाषेतील आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रसिध्द नाव आहे. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केले असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. अनुवाद-प्रकल्पासाठी त्यांना २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिके मिळाली असून त्यांनी इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद केला आहे. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणे व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसून येते.

‘काळेकरडे स्ट्रोक्स’ विषयी

काळेकरडे स्ट्रोक्स ही कादंबरी आजच्या जगण्याचे संदर्भ घेत तरुणाईचे एक वेगळे भावविश्व ,त्यातील आवर्तने व आंदोलने उभी करते. या कादंबरीतील पात्रांच्या जीवनात चांगले साकारायला जावे आणि सतत फटकाऱ्यांनी चित्राचे सौंदर्य बिघडावे असे प्रसंग घडतात. तरुणाईचे विस्कटलेले भावविश्व प्रणव सखदेव यांनी या कादंबरीत उत्तमरित्या मांडले आहे. सहज आणि साधी संवाद शैली, व्यक्तीरेखा उभी करण्याची उत्तम हातोटी, ओघवते लेखन हे या कादंबरीचे बलस्थाने आहेत.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

इंद्रजीत भालेराव,नागनाथ कोत्तापल्ले आणि भास्कर चंदनशिव या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात पुस्काराचे वितरण करण्यात येईल.

00000

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 262 /दि. 30.12.2021

No comments:

Post a Comment