नवी दिल्ली, दि. 25 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या पद्म पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे यांना ‘पद्मविभूषण’ तर प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला.आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यांच्यासह राज्यातील अन्य सहा मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी एकूण 4 मान्यवरांना ‘पद्मविभूषण पुरस्कार’ जाहीर झाले असून महाराष्ट्रातून प्रतिभावंत गायिका,संगित रचनाकार,लेखिका,प्राध्यापिका आणि विदुषी प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील एकूण 17 मान्यवरांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.
सात मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’
प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना वैद्यकीय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे आणि डॉ. हिंमतराव बावस्कर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी ज्येष्ठ लावणी गायिका व पार्श्वगीत गायिका सुलोचना चव्हाण आणि प्रसिध्द पार्श्व गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
यावर्षी एकूण 128 पद्मपुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 4 ‘पद्मविभूषण’, 17 ‘पद्मभूषण’ आणि 107 ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये 34 महिलांचा समावेश आहे. 10 अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून 13 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत .
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.17 /दि. 25 .01.2022
No comments:
Post a Comment