Thursday, 3 February 2022

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे कार्य गतीने सुरु ; केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल




नवी दिल्ली , 03 : देशाला मराठी भाषा व साहित्याचा अभिमान आहे, या भाषेला अभिमत भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून गतीने कार्य होत असून मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती आज केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी संसदेत दिली.

राज्यसभेत प्रश्नकाल सत्रात उपस्थित विषयावर बोलताना श्री मेघवाल यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जाबाबत सुरु असलेल्या कार्यवाहीविषयी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव हा सांस्कृतिक मंत्रालयाकडून भाषा तज्ज्ञांच्या समितीकडे पाठविण्यात आला. या समितीचा अहवाल साहित्य अकादमीकडे गेला व तेथे काही त्रुटींची पूर्तता झाली आहे.सद्या, हा प्रस्ताव आंतरमंत्रालय स्तरावर विचाराधीन आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय ,शिक्षण मंत्रालय आदि मंत्रालयांतर्गत सद्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरु असून या विषयाला गती आली आहे.आवश्यक चर्चा व कार्यवाहीनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असे, श्री मेघवाल यांनी सांगितले.

अद्यापपर्यंत देशातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने २००४ मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मूळ निवेदन निर्गमीत केले होते.तद्नंतर, २५ नोव्हेंबर २००५ रोजी गृहमंत्रालयाने अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला प्राधिकारी संस्था म्हणून जाहीर केले असल्याचेही श्री मेघवाल यांनी यावेळी सांगितले.

खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पूरक प्रश्नाद्वारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. खासदार सर्वश्री डॉ. विनय सहस्त्रबुध्दे आणि रजनीताई पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 22/ दि.03.02.2022


 


 

No comments:

Post a Comment