नवी दिल्ली ,दि. 28 : शालेय शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांना आज केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
पुणे, उस्मानाबाद, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेच्या सहा शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी)वतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये “वर्ष २०१८ आणि २०१९ च्या राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार” वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहसचिव एल.एस.चांगसान, एनसीईआरटीचे संचालक प्रा. दिनेश प्रसाद यावेळी उपस्थित होते.
शैक्षणिक मोबाईल ॲप,उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृष्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक,दूरचित्रवणी,आकाशवाणी,सॉफ्टवेयर,हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी देशभरातील २५ शिक्षकांना वर्ष २०१८ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. तर, देशभरातील २४ शिक्षकांना वर्ष २०१९ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले, यातही राज्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे
राज्यातील तीन शिक्षकांचा २०१८ च्या पुरस्काराने सन्मान
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना या समारंभात वर्ष २०१८चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या शिक्षकांमध्ये पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जांभूळधरा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नागनाथ विभुते, उस्मानाबाद जिल्ह्याच्या कडदोरा तालुक्यातील जगदंबानगर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक उमेश खोसे आणि पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील मल्यानराठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आनंदा अनीमवाड यांचा समावेश आहे.
तीन शिक्षकांना २०१९ चा पुरस्कार प्रदान
राज्यातील तीन शिक्षकांना वर्ष २०१९चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगावतर्फे म्हाळुंगे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मृणाल गांजळे,नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील करंजवन येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शफी शेख यांचा समावेश आहे.
मुंबई येथील एैरोली भागातील आयसीएसई खाजगी शैक्षणिक संस्था पुरस्कृत शाळेच्या शिक्षिका प्रेमा रेगो यांनाही वर्ष २०१९ च्या राष्ट्रीय आयसीटी पुरस्काराने गौरविण्यात आले.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र.42 / दि.२८.02.2022
No comments:
Post a Comment