निती आयोगाचा ‘निर्यात सज्जता निर्देशांक’जाहीर
नवी दिल्ली, दि. 25 : निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक-2021’ अहवालात 77.14 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे.
देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर, निती आयोगाने आज ‘निर्यात सज्जता निर्देशांक-2021’ (Export Preparedness Index) (दुसरी आवृत्ती) जाहीर केला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव बी.व्ही.आर. सुब्रमन्यम यांच्या उपस्थितीत हा निर्देशांक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
तीन प्रमुख मानकात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर
दोन उपमानकात राज्याचा पहिला क्रमांक
या अहवालात एकूण 4 प्रमुख मानके आणि 11 उपमानकांच्या आधारावर देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्यात क्षेत्रातील प्रगती मांडण्यात आली आहे.चार पैकी तीन प्रमुख मानकांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून पायाभूत सुविधा आणि निर्यात प्रोत्साहन धोरण या उपमानकात राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
धोरणात्मक मानकामध्ये 82.47 गुण, व्यापार परिसंस्था (इकोसिस्टीम) 86.42 आणि निर्यात परिसंस्था मानकात 81.27 गुण मिळवत महाराष्ट्र या तिन्ही प्रमुख मानकात देशात दुसऱ्या स्थानावर राहिले आहे. यासोबतच निर्यात कामगिरी या प्रमुख मानकामध्ये 49.37 गुणांसह राज्य देशात तिसऱ्या स्थानावर राहिले आहे.
उपमानकांमध्येही महाराष्ट्राची उत्तम कामगिरी राहिली आहे. यातील,‘पायाभूत सुविधा’ आणि ‘निर्यात प्रोत्साहन धोारण’ या दोन उपमानकात 100 गुण मिळवत राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ‘आर्थिक सुलभता’ आणि ‘वाहतूक उपलब्धते’तही महाराष्ट्राने देशातील अग्रगण्य राज्यांमध्ये स्थान मिळविले आहे. यासोबतच व्यापार पोषक वातावरण, संस्थात्मक संरचना, निर्यातविषयक पायाभूत सुविधा, व्यापार सहाय्य,संशोधन व विकासात्मक पायाभूत सुविधा,वृध्दी व अभिमुखता, निर्यात विविधीकरण अशा उपमानकातही महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे या अहवालात नमूद आहे.
चार प्रमुख व 11 उपमानकांच्या आधारे महाराष्ट्राला 77.14 गुणांसह या निर्देशांकात दुसरा क्रमांक मिळाला आहे. 78.86 गुणांसह गुजरात पहिल्या स्थानावर आहे. यापूर्वी ‘निर्यात सज्जता निर्देशांक-२०२०’ (प्रथम आवृत्ती) मध्येही महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकाविला होता.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 55 / दि. 25.03.2022
No comments:
Post a Comment