नवी दिल्ली, 27 : महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी आज भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी न्या.लळीत यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकैया नायडू ,माजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांचा कार्यकाळ शुक्रवारी (26 ऑगस्ट 2022) संपला. न्या. लळीत आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील व 8 नोव्हेंबर 2022 रोजी ते सेवानिवृत्त होतील. सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे न्या. लळीत यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा सोलापूरला वकिली करण्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. त्यांचे वडील न्या.उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायामूर्ती होते. न्या. उदय लळीत यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. न्या.लळीत हे 2014 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 139 / दिनांक 27.08.2022
No comments:
Post a Comment