नवी दिल्ली, दि. 7 : ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडीयम येथे आयोजित करण्यात आली. या सभेस श्री फडणवीस संबोधित करीत होते. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार बाळू धानोरकर, आमदार डॉ. परिणय फुके, माजी खासदार नाना पटोले, राज्यातील ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे तसेच देशभरातील ओबीसी महासंघातील सदस्य, ओबीसी समाजातील लोक मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदावर असतानाच्या कार्यकाळात ओबीसी समाजाकरीता स्वतंत्र मंत्रालय सुरू केले. त्यावेळी ओबीसी समाजातील 22 मागण्यांपैकी 21 मागण्या पुर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, वसतीगृह, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शिष्यवृत्ती, भारतीय प्रशासकीय सेवेच्या स्पर्धा परिक्षांर्थीचे प्रशिक्षण वर्ग आदि विषयांवर वेळेनुसार शासन निर्णय घेऊन समाजातील सर्वच घटाकांना लाभ देण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याची श्री फडणवीस यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी काही मागण्या असल्यास त्याही सरकार पुर्ण करेल असेही, श्री फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले.
ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम केंद्र शासनाने केले असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये भविष्य घडवू इच्छीणा-या तरूणांसाठी ऑल् इंडिया स्तरावर आरक्षण लागू करण्याचे कामही झाले असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगीतले.
00000
No comments:
Post a Comment