Monday 26 December 2022

‘वीर बाल दिवसा’च्या इतिहासामुळे तरूण पिढीला शौर्य, देशप्रेम व त्यागाची प्रेरणा मिळेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 





 



वीर बाल दिवस’ या ऐतिहासिक कार्यक्रमात प्रधानमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री सहभागी


नवी दिल्ली, 26 : ‘वीर बाल दिवसच्या इतिहासामुळे देशातील तरूण प‍िढीला शौर्य, देशप्रेम आणि त्यागाची प्रेरणा मिळेल, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केल्या.

 

       येथील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ऐतिहासिक वीर बाल दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री शिंदे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु तसेच गृहनिर्माण नागरी विकास मंत्री हरदिप सिंग पुरी,  केंद्रीय संस्कृती राज्य मंत्री अर्जुन मेघवाल, म‍ीनाक्षी लेखी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

 

            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, वीर बाल दिवस सारख्या सर्वोच्च त्याग सोहळयाच्या आयोजनामुळे इतिहासाची  प्रेरणा नक्कीच निर्माण होईल. यामुळे ही पिढी राष्ट्र विकासात आपले योगदान निश्चितच देईल, असे सांगुन श्री शिंदे म्हणाले,  हे वर्ष स्वातंत्र्यांचे अमृत महोत्सवी वर्ष असून या वर्षात साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांचा शहीदी दिवस  वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जात आहे. ही सर्वांसाठी संस्मरणीय ऐतिहासिक अशी घटना आहे.

            गुरू गोबिंद सिंग यांनी वाहेगुरू जी का खालसा वाहेगुरू जी की फतेहअशी उद्घोषणा देऊन अन्याया विरोधात लढण्याची ताकत लोकांना दिली. देशाच्या स्वातंत्र्य लढयातील क्रांतीकाऱ्यांमध्ये  महाराष्ट्र आणि पंजाबचा संबंध समसमान आहे. चाफेकर बंधू आणि भगतसिंह यांच्या सोबत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचेच होते. दोन्ही राज्यात क्रांतीकारांची एक गौरवशाली परंपरा आहे.

            महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आत्मीयतेचं नातं असल्याचेही मुख्यमंत्री  म्हणाले, दोन्ही राज्यातल्या मातीने अनेक वीरांना, महान संतांना जन्म दिलेला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये शतकांपासून एकोपा आहे. घुमान मध्ये संत नामदेव यांचे निवासस्थान आहे तर  नांदेडमध्ये गुरुगोबिंद सिंग जी यांचे समाधी स्थळ संचखंड श्री हजु़र साहेब  आहे.

            वर्ष 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाच्यावतीने गुरु गोबिंदसिंग जी यांची 300 वी पुण्यतिथी गुरु-ता-गद्दी  समारोह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला असल्याची आठवण याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी केली. शेती ते देशाच्या सीमासुरक्षेपर्यंत मराठी आणि पंजाबी यांचे एक अतूट नाते असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी अधोरेखित केले. गुरु गोबिंदसिंग जी पंजाबचे होते ते महाराष्ट्रात नांदेडला पोहचले. तर, संत नामदेव हे महाराष्ट्राचे होते ते पंजाबला पोहचले. संत नामदेव यांचे अभंग गुरु ग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री यांनी योवळी केला.

 गुरू गोंबिदसिंग साहेंबासारेखच छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रप्रेम आणि त्यांच्या अद्भुत शौर्यासाठी ओळखले जातात. महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढा दिला.  शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनाही मुघलांनी छळले तरी देखील संभाजी महाराजांनी माघार न घेता स्वाभिमान सोडला नाही. सर्वोच्च असे बलिदान या महापुरुषांनी दिले, त्याची प्रेरणा घेऊन तरूण पिढी वागेल अशी आशा बाळगायला हरकत नसल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

1984 मध्ये झालेल्या दंगलीत हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शीख बाधंवांना महाराष्ट्रात आश्रय दिले, याची आठवण यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केली.

 जी 20 चे अध्यक्षपद भारताला मिळालेले आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब असून यातील काही बैठका राज्यातील शहरांमध्ये होत असल्याची माहिती श्री शिंदे यांनी यावेळी दिली.

       या कार्यक्रमा दरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांनी ‘शबद कीर्तन’ केले.  प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री  यात सहभागी झाले. तसेच यावेळी येथे (दिल्लीत) काढण्यात आलेल्या मार्च पास्ट ( फेरीला) प्रधानमंत्री श्री मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

छोटे साहिबजादे यांच्या विषयी

 

     अवघ्या 9 आणि 6 वर्षांचे असणारे छोटे साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी़ यांनी मुघलांची शरणागती न पत्करता स्वाभ‍िमानाने सर्वोच्च त्याग करून धर्माचे रक्षण करत  मरण कबूल केले.  

 श्री गुरु गोबिंदसिंग यांचे सुपुत्र, साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी, यांचा बलिदानाचा दिवस, 26 डिसेंबर हा ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा प्रधानमंत्री श्री मोदी यांनी , श्री गुरु गोबिंदसिंग जी  यांच्या प्रकाश पुरबच्या दिनी 9 जानेवारी 2022 रोजी केली होती.

 

       साहिबजादे यांच्या असामान्य धैर्य आणि शौर्याची कथा, देशातल्या सर्व नागरिकांपर्यंत  विशेषतः तरुण मुलांपर्यंत पोहोचवून या इतिहासाविषयी त्यांना जागरूक करण्यासाठी सरकार अनेक संवादात्मक आणि सहभागात्मक कार्यक्रमांचे  संपूर्ण देशभर आयोजन करीत आहे. याचाच  एक भाग म्हणून, देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये, निबंध लेखन, प्रश्न मंजूषा आणि इतर उपक्रम राबवले जात आहेत. तसेच, रेल्वे स्थानके, पेट्रोल पंप, विमानतळे अशा सार्वजनिक ठ‍िकाणी याविषयी माहिती देणारी डिजिटल प्रदर्शने लावली जाणार आहेत. त्यासह संपूर्ण देशभरात, अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील.   या कार्यक्रमांमधून छोटे साहिबजादे यांचे आयुष्य आणि त्यांच्या बलिदानाची कथा, गाथा  सांग‍ीतली जाईल.

No comments:

Post a Comment